नाशिक : व्दारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन अंडरपास

नाशिक मुंबई नाका चौक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

व्दारका चौकासह मुंबई नाका चौकात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन्ही चौकांचे पुनर्नियोजन करताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी दोन स्वतंत्र अंडरपास तयार करण्याचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा समितीच्या बुधवारी (दि.१) झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. त्याचबरोबर एसटी बसेसची वाहतूक वळवण्याबरोबरच शहरात गतिरोधक नेमकी कुठे असावे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत शहरातील ब्लॅक स्पॉट, वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणा अशा विविध मुद्यांचा आढावा घेण्यात आला. अपघात प्रवण क्षेत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शहरातील २६ ब्लॅकस्पॅाटपैकी सहा ठिकाणे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, चार- पुणे राष्ट्रीय महामार्ग, चार- औरंगाबाद रोड, एक- पेठ रोड, एक- दिंडोरी रोड, तीन- त्रंबक रोड व सात मनपा रस्त्यावरील असून, शहरातील २६ ब्लॅकस्पॉटची सुधारणा करण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. तसेच पायलट टेस्टींग म्हणून पोलीस, मनपा व रेसिलियंट इंडीया संयुक्तपणे सिव्हीरीटी इंडेक्स ई-एन्फोर्समेंट सिस्टीमची पडताळणी केली जाणार आहे. मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन अंडरपास मार्ग असावेत, एकेरी मार्ग करावा, एसटीची वाहतूक वळवावी अशा काही महत्वाच्या सुचना करण्यात आल्या. ब्लॅकस्पॉटचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, शहरातील रस्त्यांवरील ३४३ ठिकाणी अनधिकृत बांधकामाबाबत नगरनियोजन विभागाने नोटीसा दिल्या आहेत. लवकरच अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीस मनपा अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, प्रादेशिक परीवहन अधिकारी प्रदीप शिंदे, पीडब्लूडीचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता उदय पालवे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने आदी उपस्थित होते.

इंदिरानगर बोगद्याचे लवकरच काम

इंदिरानगरजवळील उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बोगदा विस्ताराच्या कामाची तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. तीन चार महिन्यात कामाला सुरुवात होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बी. एस. साळुंखे व डी. आर. पाटील यांनी दिली.

गतिरोधकसाठी अशी असेल समिती

स्पीड ब्रेकरसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असून, त्यात महापालिका, एनएचएआय, पीडब्लूडी, आरटीओ, पोलिस विभागातील अधिकारी आणि के. के. वाघ इंजिनिअरींग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने या सर्वांचा समावेश असणार आहे. स्पीड ब्रेकर लावण्याने अपघात कमी होणार का? याचा अभ्यास करण्याची तसेच रात्रीच्या वेळी झाडे दिसण्यासाठी प्रकाशाचा झोत टाकण्याची सुचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली.

सात सिग्नल सुरू करण्याचे आदेश

शहरात ट्रक टर्मिनस विकसीत होण्याची गरज मनपा आयुक्तांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रक टर्मिनसचे उदाहरण दिले. शहरात एकूण ४७ सिग्नल असून, मनपाचे ४० सिग्नल आहेत. काट्या मारुती, मखमलाबाद नाका, सेवाकुंज, संतोष टी पॉईंट, स्वामी नारायण चौक, वडाळा नाका, पाथर्डी फाटा हे सात सिग्नल त्वरित सुरु करण्याचे निर्देश आयुक्त डाॅ. पुलकुंडवार यांनी दिले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी वाहतूक पोलिसांना सिग्नलजवळ विश्रांती घेण्यासाठी छोटी शेड असावी, अशी सुचना केली.

हेही वाचा :

The post नाशिक : व्दारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन अंडरपास appeared first on पुढारी.