नाशिक : शहरातील उद्याने आजपासून खुली होणार

नाशिकमधील उद्याने बंद

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

शहरातील डोळ्यांची साथ नियंत्रणात आली आहे. या साथीचा मुलांमधील वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली शहरातील ५५० उद्याने शुक्रवार(दि.१) पासून खुली केली जाणार आहेत.

मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरातही डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. जुलै महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सरासरी दीडशेच्या आसपास असलेल्या डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांची नोंद ऑगस्टमध्ये पाचशेच्या घरात गेली होती. खासगी रुग्णालयांमधील डोळ्याच्या साथीच्या रुग्णांची संख्या यापेक्षा पाच ते सहा पटीने अधिक होती. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे आढळून आले होते. लहान मुले आणि जेष्ठ नागरिक उद्यानांमध्ये खेळण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी येत असल्यामुळे या साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिका प्रशासनाने काढला होता. त्यामुळे १८ ऑगस्ट पासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या आजाराची लागण झालेल्या विद्यार्थांना चार दिवसांची सक्तीची सुट्टी देण्याचे आदेशच आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शाळांना काढले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर आले असून शहरातील डोळ्यांची साथ नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शुक्रवार पासून शहरातील सर्व ५५० उद्याने नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लहान मुलांमधील डोळ्याच्या साथीच्या प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने संपर्क टाळण्यासाठी शहरातील उद्याने पंधरा दिवसांकरीता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून ही साथ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे शुक्रवार पासून शहरातील सर्व उद्याने खुली केली जाणार आहेत.

– विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील उद्याने आजपासून खुली होणार appeared first on पुढारी.