नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

खड्डे नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील काही ठेकेदार, अधिकारी आणि एजंटगिरी करणार्‍या काही नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामात संगनमताने भ्रष्टाचार केल्यामुळेच शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. महापालिकेने येत्या आठ दिवसांत नाशिक शहर खड्डेमुक्त न केल्यास मनपाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे नजरेला पडत असल्याने वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना अपघातांना तसेच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांत रस्ते डांबरीकरण आणि अस्तरीकरणावर जवळपास 600 कोटींचा खर्च झाला आहे. यामुळे नव्याने झालेल्या या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत माजी महापौर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या कामात केलेल्या भ—ष्टाचाराकडे लक्ष वेधले.

यासंदर्भात पाटील म्हणाले की, काही नगरसेवक रस्त्यांच्या कामात ‘एजंटगिरी’ करत असल्याने भ—ष्ट ठेकेदारांचे फावत आहे. रस्ते कामांच्या निविदांमध्ये अधिकार्‍यांच्या संगनमताने रिंग केली जाते. त्यामुळे विशिष्ट ठेकेदारांनाच रस्ते कामांचा ठेका मिळतो आहे. रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकारीदेखील या भ्रष्टाचारात सहभागी असल्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होत असल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केला. पावसाने शहरातील रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले असून, मनपा आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावून त्यांच्या खर्चाने दुरुस्ती करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

अभियंत्यावर कारवाई करा
ठेकेदारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास शहर अभियंत्यावर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मनपा आयुक्त रमेश पवार चांगले काम करीत आहेत. परंतु, काही भ—ष्ट माजी नगरसेवक आणि अधिकार्‍यांनी पवार यांच्याच बदलीचा डाव आखला असल्याचा आरोप पाटील यांनी करत बदलीची धमकी दिली जात असून, संबंधितांनी त्यांची बदली केल्यास नाशिककरांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेला टोला
महापौरपदी दशरथ पाटील यांच्या कारकीर्दीत रस्त्यावर खड्डा दाखवा आणि 100 रुपये मिळवा, अशी योजना हाती घेतली होती. रस्त्यात खड्डा आढळून आल्यास त्या अधिकार्‍यांच्या वेतनातून खड्डे दुरुस्तीचे कामे केली जात होती. परंतु, आता संपूर्ण शहरालाच रस्त्यांवरील खड्ड्यांना सामोरे जावे लागत असल्याने आता चांगला रस्ता दाखवा आणि 100 रुपये मिळवा, अशी योजना राबविण्याची वेळ आल्याचा टोला पाटील यांनी महापालिकेला लगावला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा appeared first on पुढारी.