
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्याने शहरातील तीन मद्यविक्री दुकानांच्या आर्थिक व्यवहारात फेरफार करून 10 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात हेमचंद्र मोतीराम चौधरी (रा. तिडके कॉलनी) याच्यासह इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik Fraud News)
सागर विश्वनाथ सुरळकर (३६, रा. नंदुरबार) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित हेमचंद्र चौधरी हा प्रथम हिरा सेल्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होता. त्याच्यावर शहरातील दारूविक्रीच्या तीन दुकानांच्या व्यवहारांची जबाबदारी साेपवण्यात आली होती. त्यासाठी संबंधित दुकानचालकाने कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करत ते चौधरीच्या ताब्यात दिले होते. मात्र चौधरीने दुकानचालकांचा विश्वासघात करीत सुमारे १० कोटी २९ लाख रुपये स्वत:सह कुटुंबातील इतर चौघांच्या बँक खात्यात वर्ग केले. चौधरी याने आर्थिक व्यवहाराची सविस्तर माहिती न देता फक्त व्यवसायासाठी झालेला खर्च, खरेदी व विक्री यांचीच माहिती देत दिशाभूल करत होता. तसेच पैसे व्यवसायातच गुंतवत असल्याचे त्याने सांगितले. मात्र व्यवसायाच्या नफा-तोट्यात विसंगती दिसत असल्याने संबंधितांनी चौधरीकडे आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती मागितली. मात्र त्याने ती दिली नाही. चौकशीत चौधरीने तिन्ही दारूविक्री दुकानांच्या बँक खात्यातून स्वत:सह कुटुंबीयांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करून अपहार केल्याचे उघडकीस आले. त्याने एप्रिल २०१३ ते मार्च २०२३ या कालावधीत हा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात हेमचंद्र चौधरीसह रत्ना हेमचंद्र चौधरी, नीलेश हेमचंद्र चौधरी, मीनल मयूर चौधरी व मयूर हेमचंद्र चौधरी (सर्व रा. तिडके कॉलनी) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :
- घंटागाड्या दारोदारी, तरीही कचरा रस्त्यांवरी! पुण्यातील स्थिती
- Pune Cyber Crime : 66 लाखांवर डल्ला; सायबर चोरट्यांना बिहारमधून बेड्या
- दरवर्षी बांधला-तोडला जाणारा पूल!
The post नाशिक : शहरातील तीन मद्यविक्रेत्यांना दहा कोटींचा गंडा appeared first on पुढारी.