
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानींकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, सध्या हे फलक वृक्षांच्या फांद्या आणि बॅनरखाली झाकोळले गेले आहेत. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची दिशाच समजून येत नसल्याने वाहनचालक भरकटत आहेत.
गेल्या काही वर्षांत नागरिकरणासोबत नाशिक शहराची हद्ददेखील वाढली आहे. चहुबाजूंनी वाढलेल्या शहरात रस्ते, विजेसह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका पार पाडत आहे. वाढत्या शहरासोबत शहरातील प्रमुख मार्गांवर महापालिकेने कमानी उभारल्या असून, त्यावर दिशादर्शक चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत परगावाहून येणार्या पर्यटकांसाठी या कमानी मार्गदर्शक ठरतात. परंतु, या कमानींवर वृक्षांच्या फांदा आणि अनधिकृत बॅनरचे अतिक्रमण वाढल्याने त्या दिशाहीन झाल्या आहेत. परगावाहून येणार्या पर्यटकांच्या दृष्टीस हे फलक पडत नसल्याने ते भरकटत आहेत. त्यामुळे अशा पर्यटकांना इच्छित स्थळी पोहोचण्यास स्थानिकांची मदत घ्यावी लागत आहे. त्यात वाहनाचे इंधन आणि वेळ खर्ची पडत असल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि स्मार्ट नाशिक’चा नारा दिला जात असताना वृक्षांच्या फांद्या व अनधिकृत बॅनरमुळे झाकोळले गेलेल्या कमानींपायी शहराच्या विद्रूपीकरणात आणखीनच भर पडत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करणार्या महापालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, नागरिकांमध्ये रोष आहे. महापालिकेने तातडीने या कमानींवरील वृक्षांच्या फांद्या व बॅनर काढून त्या मोकळ्या कराव्या, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
या भागातील दिशादर्शक फलकांची झाली दुरवस्था:-






रंग उडाल्याने नावे देखील गायब
शहरातील काही भागांतील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली असून, त्यावरील रंग उडाले आहेत. त्यामुळे कमानींवरील नगर किंवा परिसराचे नाव अस्पष्ट दिसून येत आहेत. तर काही ठिकाणची नावे पूर्णपणे पुसली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा:
- नगर : निर्लेखन होऊनही इमारत पाडण्यास टाळाटाळ
- वेल्हे : धरणखोर्यातील पुलांना संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटनेची भीती
- शिवाजी महाराजांचा तब्बल 61 फुटी पुतळा नाशिकमध्ये घेतोय आकार
The post नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा appeared first on पुढारी.