नाशिक शहरातील निर्बंध होणार आणखी कडक! मुख्य सचिवांचे महापालिका आयुक्तांना निर्देश 

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, लॉकडाउनची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत असली, तरी सध्या तरी लॉकडाउन परवडणारा नसल्याचे मत अद्यापही अधिकारी वर्गाचे असल्याने या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन करण्याऐवजी निर्बंध कडक करा, असे स्पष्ट निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. येत्या काळात गर्दीची ठिकाणे पूर्णपणे बंद होतील. मात्र, औद्योगिक वसाहतीतील कारखाने सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले. 

साखळी खंडित करण्याचे प्रयत्न

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांसमवेत महापालिका आयुक्तांची मंगळवारी (ता. ३०) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केला. शहरात टेस्टिंग वाढविल्याने त्यातून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टेस्टिंग अधिक वाढविल्या जाणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. अशा रीतीने कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्याचे प्रयत्न आहेत. कोविड सेंटर वाढविण्याबरोबरच साडेसातशेहून अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे, सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिम कार्यान्वित करणे आदींची माहिती देण्यात आली. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 
 

आयुक्तांच्या बैठकीत महत्त्वाचे 

-गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार. 
-कोरोना चाचण्या व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविणार. 
-हॉटेल्स, मॉल्स, पानटपऱ्या, फास्टफूड दुकानांवर गर्दी झाल्यास कारवाई. 
-रुग्णांची लूट थांबविण्यासाठी मेस्मा लागू करण्याचे आदेश. 
-डॉक्टर्सर, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकणार नाहीत. 
-शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेडची संख्या वाढविणे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड