Site icon

नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबईपाठोपाठ मालेगाव आणि त्यानंतर नाशिकमध्येदेखील गोवर रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली होती. जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात 414 नमुने घेण्यात आले होते. त्यात 22 नमुने गोवर पॉझिटिव्ह आढळले होते. यातील सहा रुग्ण मुलतानपुरा आरोग्य केंद्राअंतर्गत पिंजारघाट भागातील असल्याने हा भाग मनपाने गोवर उद्रेक म्हणून घोषित केला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, 1 ते 15 जानेवारीदरम्यान 10 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

गोवर रुग्ण आढळून येत असल्याने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सिटी टास्क फोर्सची बैठक घेत विविध उपाययोजना तसेच सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय नोडल अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार पूर्व व सातपूर येथील नोडल अधिकार्‍यांनी संबंधित भागात लसीकरणाचे कमी प्रमाण असल्याने तेथील मुस्लीम धर्मगुरूंची बैठक घेऊन वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याकरता अजानद्वारे लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. वंचित लाभार्थ्यांचे 3 डिसेंबर 2022 रोजी अतिरिक्त लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फतदेखील धर्मगुरूंना आवाहन करण्यात आले होते. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 414 संशयित गोवरचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 35 अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तसेच एकट्या डिसेंबर महिन्यात एकूण 98 संशयित गोवर नमुने घेण्यात आले. पैकी 22 नमुने गोवर पॉझिटिव्ह आढळून आले होते. यापैकी सहा रुग्ण पिंजारघाट भागातील होते. सहापैकी चार रुग्ण एकाच कुटुंबातील, तर दोन रुग्ण हे शेजारील होते. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने हा भाग गोवर उद्रेक म्हणून मनपा वैद्यकीय विभागाने घोषित केला होता. यानंतर मनपा वैद्यकीय विभागाने मुलतानपूरा पिंजारघाट भागातील 512 घरांचे सर्वेक्षण केले होते. यात 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील अतिरिक्त व वंचित अशा 142 बालकांना डोस देण्यात आले होते. विशेष गोवर रुबेल लसीकरण मोहिमेअंतर्गत 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर या दरम्यान 115 विशेष लसीकरण सत्र आयोजित केले होते. दुसर्‍या फेरीत 15 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत 105 विशेष लसीकरण सत्र आयोजित केले आहेत.

गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचे गुजरात येथे पाठविलेले गोवर नमुन्यांचे रिपोर्ट दोन महिने आलेच नव्हते. जानेवारीत हे अहवाल एकदाच प्राप्त झाले. सध्या रुग्ण नाहीत. 15 जानेवारीपर्यंत 10 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पिंजारघाट भागात एकाच घरात चार आणि शेजारी दोन रुग्ण आढळून आल्याने तो भाग गोवर उद्रेक म्हणून जाहीर केला होता. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित appeared first on पुढारी.

Exit mobile version