नाशिक : शहरातील 15 अतिधोकादायक घरे रिकामी, 20 घरांना अंतिम नोटिसाा

जूने वाडे नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने शहरातील धोकादायक 1,150 पैकी 75 वाडे आणि इमारती अतिधोकेदायक ठरविले असून, आतापर्यंत 15 अतिधोकेदायक वाडे खाली करून घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरित 60 वाड्यांपैकी 20 मालमत्तांच्या पाणी तसेच वीजजोडण्या तोडण्याच्या अंतिम नोटिसा बजावण्यात आल्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

शहरातील जुने नाशिक, पंचवटी या भागात सर्वाधिक धोकादायक वाडे, घरे तसेच इमारतींची संख्या आहे. त्या खालोखाल सिडको, सातपूर, नाशिकरोड, देवळाली गाव या भागांत धोकादायक घरे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून सूचना करूनही संबंधित घरांमध्ये नागरिक वास्तव्य करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. दर पावसाळ्यात मनपाच्या नगर रचना विभागाकडून धोकादायक वाडे, इमारतधारकांना नोटिसा बजावून घर खाली करण्यास सांगितले जाते. मात्र, त्यास प्रतिसाद दिला जात नाही. परंतु, यंदा आयुक्त रमेश पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेत अतिधोकादायक इमारती व वाडे खाली करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. शहरात 1,049 धोकादायक घरे, वाडे आणि इमारती आहेत.

या धोकादायक मालमत्तांचे सी 1, सी 2 आणि सी 3 या तीन भागांत वर्गीकरण करण्यात आले असून, त्यातील 1,150 पैकी सी 1 मधील 75 वाडे व इमारती या अनातिधोकेदायक ठरविण्यात आले आहेत. यापैकी नगर रचना विभागाने 10 वाडे खाली करून घेतले तर पाच वाडे संबंधित मालमत्ताधारकांनीच खाली करून दिले आहेत. 20 वाडेधारकांना घरे खाली न केल्यास वीज आणि पाणी तोडण्याच्या अंतिम नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर 40 मालमत्ताधारकांनादेखील नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

ताबेधारकांना हक्काबाबतचा दाखला
दरम्यान, घर खाली केल्यास मालमत्तेवरील हक्क सुटेल की काय या भीतीने अनेक मालमत्ताधारक आणि त्यांच्या जुन्या भाडेकरूंकडून घर खाली केले जात नाही. परंतु, यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासन संबंधितांना मालमत्तेवरील हक्काबाबत दाखला देणार आहे. अनेक जुन्या घरांबाबत मालक आणि भाडेकरू यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने नोटीस बजावणे, वीज व पाणीपुरवठा खंडित करणे अशा प्रकारची कारवाई मनपाकडून सुरू आहे. भाडेकरू ताबा जाण्याच्या भीतीने घर खाली करत नसल्यास महापालिकेने संबंधित रहिवाशाच्या घराचे क्षेत्रफळ मोजावे आणि किती वर्षापासून राहत आहे, याची माहिती घेऊन संबंधित जागेवर ताबा असल्याचा दाखला संबधितांना देण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील 15 अतिधोकादायक घरे रिकामी, 20 घरांना अंतिम नोटिसाा appeared first on पुढारी.