नाशिक : शहरातून सव्वा लाखांचा तंबाखूजन्य साठा जप्त

तंबाखू,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विक्री व साठ्यासाठी बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दोघा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.७) ही कारवाई करण्यात आली असून, सुमारे सव्वा लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंजमाळ येथील नितीन ट्रेडर्स येथे प्रतिबंधित असलेला पानमसाला, सुंगधित तंबाखू, सुपारी असा साठा आढळून आला. या ठिकाणी पाहणी केली असता तेथे ९३ हजार ८९० रुपयांचा तंबाखूजन्य साठा आढळला. त्यामुळे नितीन रघुनाथ येवले (४०) यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सातपूर येथील मे. रिझवान एजन्सी येथेही तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने पाहणी केली असता तेथे २८ हजार ४५ हजार रुपयांचा तंबाखूजन्य साठा आढळला. त्यात विमल पानमसाला, तंबाखू, हिरा पानमसाला, झाफरानी तंबाखू आदी साठा होता. त्यामुळे प्रमोद शिवलाल पाटील (४४, रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिस ठाण्यात संशयित परवेज रबुल शेख (४९, रा. राजवाडा जवळ, सातपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने हा साठा जप्त केला आहे.

जिल्ह्यात अवैध गुटखा आणि मद्य वाहतुकीवर अधीक्षक कार्यालयातर्फे कारवाई सुरु असतानाच शहरातही गुटखा विक्रेत्यांवर छापेमारी सुरू झाली आहे. सातपूर आणि गंजमाळ या दोन ठिकाणी गुटख्याचा स्टॉक करुन विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ लाख २१ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, यापैकी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातून सव्वा लाखांचा तंबाखूजन्य साठा जप्त appeared first on पुढारी.