
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग तसेच फलक हटविण्यासाठी महापालिकेने संबंधितांना बुधवार (दि.१४)पर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने आता गुरुवार (दि.१५)पासून शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात अतिक्रमण निर्मूलन विभागाची मोहीम सुरू होत आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईचा मनपाने इशारा दिला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढदिवसानिमित्त सध्या शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर चौकांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी होर्डिंग उभे करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज, बॅनर, शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. राज्य सरकारविरोधात सुस्वराज फाउंडेशनतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने ३१ जानेवारी २०१७ रोजी अंतिम आदेश देत अनधिकृत होर्डिंग्ज, फलकांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासन तसेच महापालिकांना दिले होते. परंतु, आजमितीस पाहिल्यास न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी मनपाकडून होत नसल्याचे निदर्शनास येते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्याने तसेच महापालिकेचा महसूलही बुडत असल्याने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिक्रमण विभागाला अनधिकृत फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरात मनपा व खासगी जागेत होर्डिंग्ज लावण्याची ठिकाणे आणि त्यासाठी आकारले जाणारे शुल्क जाहीर केले आहे.
क्यूआर कोड बंधनकारक
महापालिकाने शहरातील अधिकृत होर्डिंग्जच्या जागा निश्चित केल्या असून, त्याची यादीही महापालिकेच्या www.nmc..gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी होर्डिंग्ज लावायचे असेल तर संबंधितांनी विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांत अधिकृत अर्ज दाखल करून परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच होर्डिंग्जवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण या माहितीचा क्यूआर कोड बंधनकारक केला आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूर : बोगस कामगार दाखला दिलेले इंजिनिअर अडचणीत
- नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे
- बारामती : ऊसतोडणी मजुराच्या खिशातून रक्कम काढली
The post नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात आजपासून मोहीम, यापुढे क्यूआर कोड बंधनकारक appeared first on पुढारी.