नाशिक शहरात आढळले दोन मृत पक्षी; बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांत चिंता

नाशिक : देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ असताना राज्यातही सर्वत्र खबरदारीच्या उपाययोनांच्या सूचना दिल्या आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर नियोजन सुरू असतानाच गुरुवारी (ता.१४) शहराच्या दोन भागांत मृत कबुतरे आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे.

नाशिक शहरात आढळले दोन मृत पक्षी

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने मृत पक्षी ताब्यात घेऊन शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे सुपूर्द केले. दोन्ही मृत पक्ष्यांचे स्वॅब पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, दोन दिवसांत अहवाल प्राप्त होणार आहे. सकाळी सिडको विभागातील पेलिकन पार्क व पूर्व विभागातील अशोका मार्गावर प्रत्येकी एक मृत कबूतर आढळून आले. बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर मृत पक्षी आढळल्याने चिंता निर्माण झाली.

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

पुणे प्रयोगशाळेत नमुने रवाना 

पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून महापालिकेच्या कक्षाकडे संपर्क साधून माहिती देण्यात आली. पालिकेच्या पथकाने मृत पक्ष्यांना प्लॅस्टिकच्या आवेष्टनात गुंडाळून पशुसंवर्धन विभागाकडे सुपुर्द केले. दरम्यान, बर्ड फ्लू आजाराला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहर व परिसरातील पोल्ट्री अथवा कुक्कुटपालन करणाऱ्यांनी त्यांच्या पक्ष्यांमध्ये काही मरगळ आढळल्यास महापालिकेच्या कक्षाशी (०२५३-२३१७२९२) संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले. 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर सूचना 
- पक्ष्यांच्या स्त्रावासोबत संपर्क टाळावा 
- पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याची भांडे स्वच्छ धुवावी. 
- शिल्लक मांसाची योग्य विल्हेवाट लावावी 
- मृत पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नये 
- पोल्ट्रीतील कामगारांनी हात स्वच्छ धुवावेत 
- चिकन उत्पादनाचे काम करताना मास्क व ग्लोव्हज वापरावा. 
- शंभर अंश सेल्सिअस डिग्रीत शिजविलेले मांस खाण्यात वापरावे. 
- पक्षी येत असतील त्या तलाव, नदी, नाल्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजावेत 
- अर्धवट शिजलेले चिकन, अंडी खाऊ नये 
- आजारी, सुस्त पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये 
- पूर्णपणे शिजलेले मांस व कच्चे मांस एकत्र ठेवू नये