नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील नागरीकांसाठी आरोग्य-वैद्यकीय सेवेची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता प्राणिमात्रांसाठीही भूतदया दाखविली आहे. माणसांप्रमाणेच आता शहरातील मोकाट, भटक्या जनावरांसाठी देखील रुग्णवाहिकेची सुविधा महापालिकेच्या पशुसंर्वधन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या पशू रुग्णवाहिकेसाठी महापालिकेतर्फे लवकरच टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Animal Ambulance)
शहरात पाळीव प्राण्यांप्रमाणेच भटके श्वान तसेच अन्य मोकाट जनावरांची संख्याही अधिक आहे. अनेकदा रस्त्यावरील अपघात वा अन्य काही कारणांमुळे या भटक्या प्राण्यांना इजा होते. अशावेळी त्यांना अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाहीत. तर काही आजाराने ग्रस्त असलेल्या प्राण्यांमुळे इतर प्राण्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. अशावेळी या प्राण्यांवर वेळेवर आणि आवश्यक ठिकाणी उपचार होणे गरजेचे असते. शहरातील काही प्राणीमित्र अशा मोकाट प्राण्यांची निश्चितपणे काळजी घेत आहेत. परंतु त्यांनाही अनेकवेळा मर्यादा येतात. अपघातग्रस्त वा आजारी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Animal Ambulance)
या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्राण्यांवर उपचार करणे शक्य होणार आहे. सलाईन, लसीकरण, प्राथमिक उपचाराची सोय या रुग्णवाहिकेत असणार आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली दोन कर्मचारी या रुग्णवाहिकेसोबत असतील. गरजेनुसार या रुग्णवाहिकेद्वारे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राण्यांना उपचारासाठी नेले जाईल. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे रेबीज लसीकरण मोहिम असो वा प्राण्यांसाठीच्या अन्य मोहिमा देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून राबविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.
लवकरच टोल फ्री क्रमांक(Animal Ambulance)
प्राण्यांच्या या रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लवकरच टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाणार आहे. या माध्यमातून अपघातग्रस्त वा आजारी असलेल्या मोकाट व भटक्या जनावरांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेची ही सेवा मोफत असणार आहे.
हेही वाचा :
- धक्कादायक! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या; खडकवासला येथील प्रकार
- ‘रणांगणात प्रत्यक्षात उतरण्याची वेळ, ‘INDIA’ आघाडीला नवा समन्वयक नियंत्रक चेहरा हवाय’
- Pune News : ग्रामपंचायत कर्मचार्यांचे 3 दिवस ‘काम बंद’ आंदोलन
The post नाशिक शहरात आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका appeared first on पुढारी.