नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिनाभरात नाशिकमध्ये डेंग्यू आजाराचे 140 नवे रुग्ण आढळले असून, डेंग्यू बाधितांची संख्या आता 451 च्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांमुळे शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाची डोकेदुखी कायम आहे.

डेंग्यू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच तत्काळ उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने मनपाने खासगी रुग्णालयांना रुग्णांबाबतची माहिती तत्काळ कळविणे बंधनकारक केलेले आहे. असे असताना अनेक खासगी रुग्णालयांकडून माहिती कळविली जात नाही तर काही रुग्णालये विलंबाने माहिती सादर करत असल्याने आकडेवारीबाबत गोंधळही कायम आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया सारख्या आजारांचे मूळ डासांचा प्रादुर्भाव आहे. यंदाच्या पावसाळ्यात संततधार सुरू राहिल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे साठे निर्माण झाले होते. यामुळे डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाल्याने संसर्गजन्य आजारांमध्येही वाढ झाली. डास निर्मूलन मोहिमेत मनपा प्रशासनाला यश आले नाही. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 99 रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येत वाढ होऊन 139 संख्या झाली.

मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी होण्याची अपेक्षा असताना तब्बल 140 नवे बाधित आढळून आले. डेंग्यूपाठोपाठ चिकुनगुनियाचे आतापर्यंत 28 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव कमी आहे. एकीकडे डेंग्यू, चिकुनगुनियाची रुग्णसंख्या वाढत असताना तापसदृश आजाराने शहरात थैमान घातले आहे. गेल्या महिनाभरात मनपाच्या रुग्णालयांत तापसदृश आजाराच्या 2,735 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालयांतील तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.

स्वाइन फ्लूबाबत घ्या काळजी
शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लू आजाराचे 148 रुग्ण आढळून आले असून, यापैकी दहा रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. हिवाळा सुरू झाल्याने वातावरणात निर्माण झालेला गारवा स्वाइन फ्लूला पोषक ठरण्याची भीती आरोग्य वैद्यकीय विभागाने व्यक्त केल्याने या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार appeared first on पुढारी.