
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या शहरात स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या संशयितांचा आकडा 245 पर्यंत पोहोचला असून, आतापर्यंत 70 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये शहरात डेंग्यूचे अवघे 23 रुग्ण आढळून आले होते. मात्र, ऑगस्टमधील ही संख्या तीनपट झाल्याने चिंता वाढली आहे.
शहरात डेंग्यू, चिकुनगुनियासह साथीच्या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून शहरात ठेकेदारामार्फत औषधे व जंतुनाशकांची फवारणी केली जाते. परंतु हा ठेकाच गेल्या सव्वादोन वर्षांपासून वादात सापडल्याने, शहरात धूर फवारणीचे काम सक्षमतेने होत नसल्याची विदारक स्थिती सध्या बघावयास मिळत आहे. परिणामी शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मे महिन्यात शहरात डेंग्यूचे अवघे पाच रुग्ण होते. त्यानंतर जूनमध्ये हा आकडा 11 पर्यंत पोहोचला होता. जुलैत डेंग्यूबाधितांची संख्या 23 पर्यंत मर्यादित होती. परंतु, ऑगस्ट महिन्यात तीन आठवड्यांत त्यात तीनपट वाढ झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 245 संशयितांचे रक्ताचे नमुने घेतले असून, त्यापैकी तब्बल 70 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत शहरात डेंग्यूंच्या रुग्णांची संख्या 142 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढला असतानाच मलेरिया विभाग मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचा दावा करत आहे. गेल्या वर्षी जुलैत 185, तर ऑगस्टमध्ये 311 डेंग्यूबाधित होते, असा दावा मलेरिया विभागप्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केला आहे.
683 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या
डेंग्यूचा प्रसार होऊ नये याकरिता मलेरिया विभागाने घरोघरी भेटी देऊन डेंग्यूच्या डासांच्या अळ्या तपासणीची मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत लाखभर घरांना भेटी देऊन तपासणी केली असून, 683 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या सर्वांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती डॉ. त्र्यंबके यांनी दिली आहे. सोबतच शहरात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 1,378 ठिकाणांहून टायर उचलण्यात आल्याचा दावा केला आहे.
कोरोनाने आपल्याला मास्क घालण्याची सवय लावली आहे. ज्या गतीने स्वाइन फ्लूचा प्रसार होत आहे, त्यावरून नागरिकांनी ही सवय आणखी काही काळ कायम ठेवण्याची गरज आहे. मास्कमुळे हवेतून पसरणार्या विषाणूंपासून संरक्षण होण्यास मदत होते. तसेच हस्तांदोलन करणे टाळावे, थोडा जरी ताप आला तरी, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. राजश्री पाटील, अध्यक्ष, आयएमए, नाशिक
हेही वाचा :
- सरकारमध्ये फक्त चाळीस आमदारांचे लाड
- सांगली : मासे मृत्यू प्रकरण: ‘एनजीटी’ने अहवाल मागवला
- आमदार नीलेश लंकेंचे शिवबंधन पुन्हा चमकले! आत्महत्येच्या तयारीतील युवकांचे समुपदेशन
The post नाशिक शहरात डेंग्यू संशयितांचा आकडा गेला 245 पार, 'इतक्या' जणांना लागण appeared first on पुढारी.