
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पादचारी महिला, युवक, नागरिकांना लक्ष्य करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल ओरबाडून नेल्याच्या घटना शहरात घडत आहेत. १ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान, जबरी चोरीच्या २४ घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी मोजक्याच घटनांमधील संशयितांना पकडण्यात आले असून, इतर चोरटे अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे जबरी चोरी करणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
ओमकारनगर येथील रहिवासी हेमलता सुभाष बधान या रविवारी (दि.२६) रात्री ८.३० च्या सुमारास घरासमोरून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चाेरट्यांनी हेमलता यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची एक तोळे वजनाची पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी हेमलता यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. या आधीही शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिला, नागरिकांकडील दागिने, किंमती ऐवज ओरबाडून नेला आहे. गुन्हे शाखेने तिघांना पकडून जबरी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले. त्याचप्रमाणे बसस्थानकात प्रवाशाकडील दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागरिकांनी पकडले होते. मात्र, अद्याप इतर गुन्ह्यांमधील चोरटे फरारच असून, त्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. नागरिकांचे लाखो रुपयांचे दागिने, किमती ऐवज अद्याप चोरट्यांच्याच ताब्यात असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दुचाकीवर बसून फरार
बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, लग्न कार्यालयाजवळील परिसरात दुचाकीस्वार चोरटे सक्रिय असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे सकाळी व सायंकाळनंतर चोरटे नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. त्यात पादचाऱ्यांकडील किमती ऐवज काही क्षणात ओरबाडून चोरटे दुचाकीवर बसून फरार होत आहेत. काही घटनांमध्ये एकच चोरटा असल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा:
- Share Market Closing Bell – बाजारात घसरण : अदानी पोर्टसचा दिलासा तर बाजाज ऑटोची मोठी घसरण
- IPL 2023 : आयपीएलचे सामने ‘या’ नवीन नियमाने खेळवले जाणार! जाणून घ्या…
- टेक ऑफवेळी SpiceJet विमानाचे ब्लेड तुटले; मोठी दुर्घटना टळली, कोलकत्ता विमानतळावर हायअलर्ट
The post नाशिक : शहरात दुचाकीस्वार चोरटे सुसाट appeared first on पुढारी.