Site icon

नाशिक : शहरात पहिल्या टप्प्यात उभारणार ५७ चार्जिंग स्टेशन्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत नाशिक महापालिका शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५७ ठिकाणी स्टेशन उभारले जाणार असून, २२ ठिकाणी नवी दिल्लीतील युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत (यूएनडीपी), तर केंद्र शासनाच्या नॅशनल क्लिनर पॉलिसीअंतर्गत (एनकॅप) ३५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे.

महानगरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत वाढणाऱ्या वाहनांची संख्या तसेच वाढते औद्योगिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणातही वाढ होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिकेने सीएनजी तसेच इलेक्ट्रिकल वाहनांना प्राेत्साहन देण्याचे धाेरण ठरविले असून, त्यानुसार सध्या काही शहर बसेस या सीएनजीवर धावत आहेत. केंद्र व राज्य शासनानेदेखील सरकारी वाहने खरेदी करताना इलेक्ट्रिकल वाहनांनाच प्राधान्य देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल वाहनांना प्राेत्साहन देण्यासाठी शहरांमध्ये तसेच इतरही ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभे राहणे आवश्यक असल्याने ही बाब लक्षात घेता दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता सहकार्य करण्यासाठी पावले टाकली आहेत. नाशिक शहरातदेखील २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निधी देण्याची यूएनडीपीने तयारी दर्शविली असून, त्यांना ठिकाणांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच मनपाच्या जवळपास ३५ जागांवर एन कॅप योजनेअंतर्गत चार्जिंग स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाचे सेवानिवृत्त सचिव दीपक म्हैसकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची बैठक झाली. बैठकीमध्ये निधी मिळविणे तसेच त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

येथे उभारणार चार्जिंग स्टेशन्स

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, मनपा पूर्व, पश्चिम, सिडको, नाशिकरोड, सातपूर आणि पंचवटी विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल, झाकिर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालय उपनगर, आरटीओ कॉलनीलगत बोधलेनगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक तसेच महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी मार्केट, रामसृष्टी उद्यान, रामदास कॉलनी गार्डन कॉलेजरोड, तपोवन बसडेपो, राजे संभाजी स्टेडिअम तसेच अन्य पालिकेच्या काही जागा शोधून त्याठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

प्रदूषण कमी व्हावे याकरता शासनामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून त्यास प्रोत्साहन देण्याकरता शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. त्यानुसार मनपा पहिल्या टप्प्यात ५७ जागा उपलब्ध करून देणार आहे.

– उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता- यांत्रिकी व विद्युत

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात पहिल्या टप्प्यात उभारणार ५७ चार्जिंग स्टेशन्स appeared first on पुढारी.

Exit mobile version