नाशिक शहरात पुन्हा रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट मोहीम; महापालिकेतर्फे १ लाख किटची खरेदी 

नाशिक : गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्याच पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांत वैद्यकीय विभागाने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक लाख किट खरेदी करण्यात आले आहेत. 

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना संसर्ग वाढण्यास सुरवात झाली. त्या मुळे कोरोना रुग्ण शोधण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली. एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील २२ लोकांचा शोध घेऊन त्यांची ॲन्टिजेन टेस्ट केली जात होती. या मुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत होती. राजकीय पक्ष, नगरसेवक, तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोहिमेत एक लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना लाट नियंत्रणात आली.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

जानेवारी महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्याने कोरोना संपुष्टात आल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कोरोना परिस्थिती फारशी गांभीर्याने घेतली नाही. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. परिणामी, शहरातील रुग्णालयांमधील बेड फुल झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरसेवकांकडून ॲन्टिजेन टेस्ट करण्याची मागणी वाढली. त्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय विभागाने एक लाख ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हाफकिन बायो फार्मा यांच्या दरानुसार आनंद केमिस्युटिक्स, पुणे या मक्तेदार कंपनीमार्फत एक लाख किट खरेदी करण्यात आले आहे. स्थायी समितीकडे कार्योत्तर मंजुरीसाठी ५७.१२ लाख रुपयांच्या कार्योतर खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी