नाशिक शहरात वाढले फसवणुकीचे प्रकार, ‘असा’ घालताय भामटे गंडा

नोकरीचे आमिष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात फसवणुकीचे प्रकार वाढत असून, वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना गंडा घालण्यात भामटे सक्रिय आहेत. गत वर्षात फसवणूक प्रकरणी १५१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ११६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर २०२१ मध्ये १२४ गुन्हे दाखल होते. त्यापैकी अवघ्या २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामुळे २०२१ च्या तुलनेने फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये व गुन्ह्यांची उकल करण्यात वाढ झाल्याचे दिसत आहे.

भामट्यांकडून नागरिकांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून किंवा नागरिकांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत गंडवले जात आहे. त्याचप्रमाणे ओळखींच्याकडून अपहाराचे प्रकारही घडत आहेत. फसवणूक करीत भामट्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. २०२१ मध्ये काेरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांना सर्वाधिक ऑनलाइन गंडा घालण्यात आला. कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने पोलिसांनाही फसवणुकीचा तपास करताना अडचणी आल्या. त्याचा अप्रत्यक्ष फायदा फसवणूक करणाऱ्या भामट्यांना झाला. त्यामुळे नागरिकांचे पैसे भामट्यांकडेच आहेत. तर गत वर्षात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घटल्याचे आढळून आले. मात्र, ओळखींच्याकडून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढलेले दिसले. काही प्रकरणांमध्ये तक्रारदार पोलिसांपर्यंत आले नसल्याचेही बोलले जाते.

या प्रकारे झाली फसवणूक
– नोकरी, रोजगाराचे आमिष दाखवून पैसे उकळले
– ऑनलाइन व्यवहार करताना गंडा
– बनावट व्यक्ती, कागदपत्रे तयार करून मालमत्तांची खरेदी विक्री करीत मूळ मालकांना गंडा
– कागदपत्रे मिळवून परस्पर कर्ज घेत गंडा
– सहलीला नेण्याच्या बहाण्याने गंडा

ऑनलाइन व्यवहरातही घ्या काळजी

ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करताना भामट्यांनी दुसऱ्यांच्या नावे बँक खाती, एटीएम कार्ड घेत फसवणुकीचे पैशांचे व्यवहार केले. तर काही प्रकरणांमध्ये भामट्यांनी ऑनलाइन खरेदी किंवा इतर थकीत बिले भरून पैसे वापरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात वाढले फसवणुकीचे प्रकार, 'असा' घालताय भामटे गंडा appeared first on पुढारी.