नाशिक शहरात संचारबंदी आणखी कडक; ग्रामीण भागातही कलम १४४ लागू

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात संचारबंदीचे आदेश लागू करीत अधिसूचना काढली आहे. 

गुरुवारी (ता. ११) पहाटेपासूनच संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली असून, नाशिक शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३चे कलम १४४ (ळ)(१) (३) नुसार निर्बंध तसेच मनाई आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातही कलम १४४ लागू केला आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ग्रामीण भागात नागरिकांनी सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे बंधनकारक करीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी राहणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रांतील सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी जास्तीत जास्त २० नागरिकांना एकत्र येण्याची मुभा देण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.  

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड