Site icon

नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मनपा आरोग्य वैद्यकीय आणि मलेरिया विभागाकडून होणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत असून, त्यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा १०० च्या आत होता. आता मात्र या महिन्यात २७ दिवसांतच डेंग्यूचे ११८ रुग्ण आढळले आहेत. शहरात डेंग्यू, चिकूनगुणिया, स्वाइन फ्लू यासारख्या साथीच्या आजारांबरोबरच व्हायरल फिव्हरच्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे.

वातावरणातील बदल आणि संततधार पाऊस यामुळे गेल्या अडीच-तीन महिन्यांत साथरोगांनी नाशिककरांना हैराण केले आहे. पावसाच्या पाण्याच्या साचलेल्या डबक्यांमध्ये तसेच अनेक ठिकाणी रहिवासी तसेच व्यावसायिक मालमत्तांच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या साठ्यांमुळे डासांची उत्पत्ती स्थाने वाढली आहेत. साथरोग वाढत असताना, औषध फवारणीचे कामही शहरात पूर्ण क्षमतेने होत नसल्याने डासांच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात स्वाइन फ्लूचा जोर कमी झाला आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मात्र वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे ९९ रुग्ण आढळून आले असून, सप्टेंबरमध्ये त्यात वाढ झाली आहे. २७ दिवसांत ४९६ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आयुक्तांना व्हायरल फिव्हर

मनपा आयुक्त तथा प्रशासक डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्हायरल फिव्हरमुळे प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे आता तरी किमान मनपाच्या आरोग्य वैद्यकीय तसेच मलेरिया विभागाने ताप तसेच अन्य साथरोगांचा बंदोबस्त करून सामान्यांना दिलासा दयावा, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण appeared first on पुढारी.

Exit mobile version