
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील ३९१ हॉटेलसह १९६ रुग्णांलयांनी फायर ऑडिटच केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, महापालिकेने या सर्वांना अंतिम नोटीसा बजावत १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच
ऑडिट न केल्यास संबंधित हॉटेल, रुग्णालयाचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले जाणार असल्याचे बजावले आहे. आगीच्या घटना टाळ्ण्यासाठी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ प्रमाणे महापालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रुग्णालये इमारती, बहुमजली शाळा, महाविद्यालय, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स, क्लासेस आदी ठिकाणी अग्निप्रबंधक उपाययोजना करण्यासाठी फायर ऑडीट आवश्यक आहे. मात्र, शहरातील हॉटेल्स आणि रुग्णालय चालकांकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याची बाब समोर आली. वारंवार नोटीसा बजावून देखील याकडे कानाडोळा केला जात असल्याने, महापालिकेने आता १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मुदतीत फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील ६५२ पैकी ४५६ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले आहे. तर उर्वरीत रुग्णालयांनी अद्यापही फायर ऑडीट केले नाही.
दरम्यान, महापालिकेने नोटीसा बजावून देखील रुग्णालय, हॉटेल चालकांनी त्यास केराची टोपली दाखविली आहे. यापूर्वी फायर ऑडीटसाठी २० मार्चची अंतिम मुदत देण्यात आली होती. पुढे मुदत वाढवून देखील देण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने, आता महापालिकेकडून आक्रमक धोरण राबविले जात आहे.
शहरातील ज्या खासगी रुग्णालये तसेच हॉटेल व्यावसायिकांनी फायर ऑडिट केले नाही, त्यांची लिस्ट तयार करून विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाईच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. वर्षातून दोनदा फायर ऑडिट करणे गरजेचे आहे.
विभाग – रुग्णालये – हॉटेल
पश्चिम व पूर्व – ४९ – १७८
सातपूर – १० – २१
नाशिकरोड – २६ – ६२
सिडको – ६१ – ६५
पंचवटी – ५० -65
हेही वाचा :
- कोल्हापूर : कावणेतील मल्लाला नियतीनेच हरविले
- बांधकाम परवानगीप्राप्त भूखंडावर ‘एनए’ परवानगीची आवश्यकता नाही : महसूलमंत्री विखे-पाटील
- Monsoon Update : अरबी समुद्रात बाष्पयुक्त वार्यांना वेग; 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहोचण्याचा अंदाज
The post नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर appeared first on पुढारी.