Site icon

नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 10-12 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधारेमुळे शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक बेजार झाले आहेत. त्यामुळे मनपावर रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे खड्डे दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. परंतु, अशातही बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण केले जात असून, चार दिवसांत 2,670 खड्डे पेव्हरब्लॉकने बुजविण्यात आले आहेत.

गेल्या दीड दोन वर्षांत शहरात अनेक नवीन रस्त्यांचे डांबरीकरण आणि अस्तारीकरणाची कामे होऊनही 10-12 दिवसांच्या पावसाने अनेक रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे. यामुळे खडी आणि कच वर आल्याने वाहनधारक आणि पादचारीदेखील त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून केला जात असल्यामुळे मनपाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचेही काम संशयास्पद असल्याची बाब समोर आली आहे. त्याची दखल घेत मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बांधकाम विभागाला खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयुक्तांनी स्वत: काही रस्त्यांची पाहणी केली आहे. नवीन रस्त्याचे काम झाल्यानंतर तेव्हापासून तीन वर्षांकरता संबंधित ठेकेदाराकडे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असते. अशा प्रकारचे नाशिक शहरात 200 किमीचे 34 रस्ते तयार करण्यात आले असून, त्यापैकी काही रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी केली. अपवाद वगळता बहुतांश रस्ते सुस्थितीत असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर संबंधित रस्त्यावरील डांबराचा थर ठेकेदारांकडून टाकून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांच्या सूचना
नाशिक शहरात 2,200 किमी इतके रस्ते आहे. या रस्त्यांवर एकूण 6,270 इतके खड्डे आहेत. त्यातील 3,600 खड्डे तातडीने भरण्यात आले असून, 2,670 खड्डे पावसाने उघडीप दिल्यानंतर तातडीने भरण्यात येणार आहेत. रस्त्यांवरील खड्डे ढोबळमानाने न भरता तांत्रिकदृष्ट्या योग्यरीतीने भरण्याची सूचना आयुक्तांनी बांधकाम विभागाला केली आहे. खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉक टाकताना चौकोनी खड्डा करून मगच खड्डे बुजविण्यात येत आहे जेणेकरून वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागणार नाही.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या 'या' सूचना appeared first on पुढारी.

Exit mobile version