नाशिक शहराला अवकाळीने झोडपले! ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित; झाडे कोसळली 

नाशिक : नाशिक शहर व उपनगरात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. 

सिडाकोत झाडांच्या फांद्या तुटल्या 
सिडको : सिडकोसह परिसरात गुरुवारी सायंकाळी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्या, तर काही ठिकाणी शिवजयंतीनिमित्त लावलेले फलक फाटले. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे सिडकोतील विविध परिसरात भाजी विक्रेते तसेच व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. उंटवाडी येथे रस्त्यात मोठ्या झाडाची फांदी तुटून रस्त्यात पडली. सिंहस्थनगर येथे सेंट लॉरेन्स शाळेच्या समोरच झाडाची फांदी कोसळल्याने रस्ता काही वेळ बंद झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. रात्री वीजप्रवाह बंद झाल्याचे दिसून आले. 
-- 
सातपूरला कंपन्यांना फटका 

सातपूर : सातपूर, अंबड औद्योगिक व कामगार वसाहतीमध्ये अवकाळी पावसाने दैना उडविली. अनेक ठिकाणी वीजतार तुटल्यामुळे उद्योगांना आपले उत्पादन बंद करण्याची वेळ आली. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे उद्योग संघटनांनी सांगितले. सातपूर, अंबडमधील अनेक फेरीवाले, विक्रेत्यांना व्यवसाय बंद करावा लागला. कोरोनानंतर कुठेतरी औद्योगिक वसाहत पूर्ववत होत असताना दोन महिन्यांपासून विविध कारणांनी विजेचा लपंडाव सुरू झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. 
हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 
देवळालीत देखावे भिजले 
देवळाली कॅम्प : बेमोसमी पावसामुळे शिवजयंतीच्या उत्सवासाठी सज्ज झालेले देखावे भिजले. राहुरी दोनवाडे शिवारात गारांसह पाऊस झाला. पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडविली. शिवजयंती उत्सवासाठी उभारण्यात आलेले भव्य देखावे पावसामुळे भिजल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दुपारी चारच्या सुमारास पावसाची सुरवात झाली. राहुरी दोनवाडे शिवारात गारांसह पाऊस झाला. याचा फटका भाजीपाला पिकांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. 

वीज केंद्रात बिघाड 

एकलहरे : येथील औष्णिक वीज केंद्रातील १३२ केव्ही सबस्टेशनला बिघाड झाल्याने केंद्राची वसाहत प्रशासकीय इमारत अंधारात बुडाली होती. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने त्रास सहन करावा लागला. 

म्हसरूळ भाग प्रभावित 
म्हसरूळ : पंचवटी उपविभागांतर्गत नामको हॉस्पिटलजवळ ३३ केव्ही एपीएमसी आणि ३३ केव्ही मेरी लाइन वाहिनीजवळ झाड पडल्यामुळे म्हसरूळ, दिंडोरी रोड, मखमलाबाद नाका हा भाग प्रभावित झाला. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश 

वीटभट्टीधारकांचे नुकसान 
इंदिरानगर : अवकाळी पावसामुळे राजूरबहुला येथील वीटभट्टीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी तयार करण्यात आलेल्या विटा वाळत घातल्या असता अचानक पाऊस आला. पावसाचे पाणी साठल्यामुळे विटा विरघळल्या. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवघ्या काही मिनिटांत विटांचे चिखलात रूपांतर झाल्याची माहिती वीटभट्टीचालक धनंजय भालेराव यांनी दिली.