Site icon

नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (दि.२९) दुपारी २.३० च्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि पुढील काही मिनिटांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाने शहराला झोडपून काढल्याने रस्ते जलयम झाले. तर कालिका यात्रोत्सवामधील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे हाल झाले.

अरबी समुद्रातील कमीदाबाच्या पट्ट्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिक शहरात तब्बल दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाचा वेग अधिक असल्याने काही क्षणांत रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी छत्र्या-रेनकोट घरी ठेवले. मात्र, अचानक आलेल्या पावसाने सामान्यांची कोंडी झाली.

शहरात पावसाने उघडीप दिल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील रस्ते बुजविण्याचे काम हाती घेतले. मात्र, अर्धा तासाच्या पावसाने पुन्हा रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून चालकांना त्यातून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता नवरात्रोत्सवनिमित्ताने परिसरात छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहे. पण, वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने विक्रेत्यांची दुकानातील माल वाचविण्यासाठी धावपळ उडाली.

ठिकठिकाणी बत्ती गुल

अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील महावितरणच्या कारभाराची पोलखोल झाली. ठिकठिकाणी बत्ती गुल झाली. तर अनेक भागांमध्ये सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे शहरवासीयांनी राेष व्यक्त केला.

हेही वाचा :

The post नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय appeared first on पुढारी.

Exit mobile version