Site icon

नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, २२६ कोटींऐवजी आता सुधारित ३५० कोटींचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनास सादर केला असून, शासनाने तांत्रिक बाबी तपासणीसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविला आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ टक्के निधी महापालिकेला प्राप्त होईल. तर महापालिकेला स्वत:चा ५० टक्के निधी योजनेसाठी खर्च करावा लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सत्ताकाळात नाशिक शहरातील नववसाहतीत जलवाहिन्या टाकण्यासाठी अमृत- १ अभियानअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने जुन्या जलवाहिन्या बदलणे, नववसाहतीत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणारे, जुन्या जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे अशा काही महत्त्वाच्या कामांचा समावेश असलला २२६ कोटींचा प्रस्ताव २०१९ मध्ये राज्य शासनाकडे सादर केला होता. शासनाने प्रस्ताव तांत्रिक छाननीसाठी जीवन प्राधिकरणकडे पाठविला असता त्यास तांत्रिक मान्यता मिळाली. परंतु, महापालिकेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे जाईपर्यंत अमृत- १ मधील महाराष्ट्राच्या हिश्श्याचा निधी संपला होता. त्यामुळे मनपाचा प्रस्ताव कालपर्यंत प्रलंबितच होता. तत्कालीन प्रशासक रमेश पवार यांनी प्रस्तावाविषयी पाठपुरावा केला असता शासनाने सुश्तरि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यमान आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ३५० कोटींचा सुधारित प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाला सादर केला आहे.

गावठाणात नवीन पाइपलाइन

सुधारित प्रस्तावानुसार सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम विभागांत पाणीपुरवठा करणाऱ्या २२ किमीच्या ५०० ते १२०० मिमी व्यासाच्या सिमेंटच्या जुन्या जलवाहिन्या बदलून ७०० ते १२०० मिमी व्यासाच्या नवीन लोखंडी जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच पंचवटी व जुने नाशिकमधील गावठाण भागात १०० किमी लांबीच्या पाइपलाइन टाकण्यात येणार असून, नव्याने विकसित झालेल्या भागात ८५ किमी लांबीच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

आधीच्या प्रस्तावात अनेक बाबींचा समावेश करण्यात आला असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत-२ अंतर्गत आता सुधारित ३५० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याची तांत्रिक छाननी झाल्यानंतर शासनाकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. – शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मनपा

एक नजर आकडेवारीवर

– शहरात जलशुद्धीकरण केंद्रे – सात

– शहरातील जलकुंभांची संख्या – ११०

– नव्याने उभारण्यात येणारे जलकुंभ – ०९

– पाणी वितरण करणाऱ्या पाइपलाइन – २ हजार किमी

– पंपिंग स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइन – ८३ किमी

– जलशुद्धीकरण ते जलकुंभापर्यंत पाइपलाइन – २२८ किमी

हेही वाचा:

The post नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर appeared first on पुढारी.

Exit mobile version