नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी

शालिमार अतिक्रमण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने चार मेरोजी धडक कारवाईत बुलडोझरच्या सहाय्याने शालिमारला महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील कब्रस्तानला लागून असलेल्या भूखंडावर जमीनदोस्त केलेल्या अनधिकृत २४ पत्र्याच्या दुकानांच्या जागेवर कारवाईच्या पाचव्याच दिवशी पुन्हा पत्र्याचे शेड उभारले जात आहेत. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

गेल्या २६ वर्षांपासून या भूखंडावर अनाधिकृतपणे २४ पत्र्यांचे शेड उभारून दुकाने थाटण्यात आली होती. ही दुकाने तत्काळ हटविण्यात यावीत म्हणून महापालिकेकडून वारंवार विक्रेत्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, विक्रेत्यांनी अतिक्रमण काढण्यास सपशेल नकार दिला होता. या अतिक्रमणामुळे या भागातील रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अशात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळी सहाच्या सुमारासच बुलडोझरच्या सहाय्याने पत्र्याचे दुकाने जमीनदोस्त केली होती. मात्र, अवघ्या पाचच दिवसात पुन्हा एकदा याठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याचा प्रकार समोर येत आहे.

काही विक्रेत्यांनी पत्रे ठोकण्यास सुरुवात केली असून, पुन्हा एकदा अनाधिकृतपणे याठिकाणी पत्र्याची दुकाने थाटली जाण्याची शक्यता आहे. अशात महापालिका पुन्हा कारवाई करणार काय? याकडे लक्ष लागून आहे.

महापालिकेची अर्धवट कारवाई

गेल्या ५ मे रोजी महापालिकेने सकाळी सहालाच पत्र्यांच्या शेडवर बुलडोझर चालविला होता. मात्र, कारवाईनंतर याठिकाणी पडलेले पत्रे तसेच इतर साहित्य जप्त करण्यास महापालिकेने तत्परता दाखविली नाही. विक्रेत्यांना नोटीसा बजावून देखील त्यांनी पत्र्यांसह इतर साहित्य हटविले नव्हते. अशात महापालिकेच्या पथकाकडून हे साहित्य जप्त करणे अपेक्षित होते. मात्र, पथकाने याकडे दुर्लक्ष केल्याने याठिकाणी पडून असलेले पत्रे पुन्हा एकदा उभे केले जात आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी appeared first on पुढारी.