नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील पुनर्वसित गाव दरेवाडी येथील शाळा बंद करून अन्य शाळेत समायोजन करण्याचे पत्र पालक सभेत वाचून दाखवणार्‍या केंद्रप्रमुखांना मारहाण करत संतप्त पालकाने केंद्रप्रमुख माधव उगले यांचे नाक फोडल्याची घटना घडली.

यावेळी अन्य शिक्षकांनी संतप्त पालकांना शांत केल्याने बाका प्रसंग टळला. माधव उगले यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर बाळू देवराम गांगड या पालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व शिक्षक संघटनांनी तातडीने संशयिताला जेरबंद करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यात दरेवाडी हे धरणामुळे विस्थापित गाव असून, या गावातील शाळा बंद करण्यात आल्याने पालकांसह ग्रामस्थ संतापले होते. गेल्या महिन्यात शाळा बंद करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. गत महिन्यात 5 ऑगस्टला पहिली ते चौथीचे विद्यार्थी दरेवाडीपासून इगतपुरी पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्यासाठी 5 कि.मी.अंतर पायी येत असताना गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी त्यांना रस्त्यावर थांबवून शाळा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा शाळा बंद करण्यात येत असल्याचे पत्र केंद्रप्रमुख उगले यांनी वाचून दाखवताच संतापाचा भडका उडाला. लेखी आश्वासनाचे काय झाले, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित करत आम्हाला सगळ्यांना अटक करा, अशी मागणी दरेवाडीच्या ग्रामस्थांनी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक appeared first on पुढारी.