Site icon

नाशिक : शाळेच्या मैदानावर अल्पवयीन विद्यार्थिनीस धमकावत विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेसच्या परिसरात व आसपास टवाळखोरांचा वावर वाढल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. टवाळखोर व बाहेरील मुलांच्या वावरण्यामुळे वाद, हाणामारी, मुलींच्या छेडछाडीसारखे प्रकार नित्याचे झाले आहेत. इंदिरानगर परिसरातील शाळेत विद्यार्थिनीस एकाने दमदाटी करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात छेड काढणाऱ्याविरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शिवा उर्फ शुभम ताकतोडे (रा. उपेंद्रनगर) याने गुरुवारी (दि. १६) दुपारी राणेनगर येथील एका शाळेच्या मैदानावर पीडितेस अडवून, तू माझ्यासोबत फिरायला आली नाही तर तुझ्याकडे बघतो, अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडिता भयभीत झाली व ती वर्गात न जाता समाजमंदिरात गेली. शाळा सुटल्यावर ती घरी गेली त्यावेळी घाबरलेली दिसल्याने पालकांनी पीडितेची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संशयित शुभम हा पीडितेचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याने पालकांनी शुभमला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पालकांनाही शिवीगाळ करीत धमकावले. त्यामुळे शुभमविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांनी शुभमला अटक केली आहे.

या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांजवळ टवाळखोरांचा वावर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळकरी विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, त्यांच्याकडे बघून शेरेबाजी करणे, इतर विद्यार्थ्यांवर धाक निर्माण करून त्यांच्यामार्फत विद्यार्थिनींशी जवळीक साधण्याचे प्रकार टवाळखोरांकडून होत आहेत. याआधीही एका सराईत गुन्हेगाराने शाळकरी विद्यार्थ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीची छाप पाडून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चोरी केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे शाळा सुटल्यानंतर किंवा भरण्याआधी टवाळखोर दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव चालवून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत असतात. मात्र त्याकडे शैक्षणिक संस्था किंवा पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. शैक्षणिक संस्थाचालक फक्त संस्थेच्या आवारातील जबाबदारी घेत असले, तरी आवारात संस्थेबाहेरील टवाळखोरांचा वावर दिसत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शाळेच्या मैदानावर अल्पवयीन विद्यार्थिनीस धमकावत विनयभंग appeared first on पुढारी.

Exit mobile version