नाशिक : शिंदे गटाची ताकद वाढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मिळाल्याने साहजिकच आता त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मनगटात जोर वाढणार आहे. ही ताकद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गटासह इतरही राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरू शकते. पक्षाचे नाव आणि चिन्ह नसताना गेल्या काही दिवसांत शिंदे गटाकडील इनकमिंग पाहता, येत्या काळात प्रवेश करणार्‍यांच्या संख्येत वाढच होणार आहे.

तुर्कीच्या शक्तीशाली भूकंपाला १२ दिवस पूर्ण; भूकंपबळींची संख्या ४६ हजारांवर

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील इच्छुक ताकदवान उमेदवार आणि पदाधिकार्‍यांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यातही गेल्या दोन महिन्यांपासून पाहिले, तर केवळ शिंदे गटाचेच प्रवेश सोहळे अधिकाधिक रंगत आहेत. त्याखालोखाल ठाकरे गटामध्ये लोक प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातून सिडको विभागातील काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अद्याप त्यास मुहूर्त लागू शकलेला नाही. संबंधित नगरसेवकांनी तर नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर भाजप आणि शिंदे गटाच्या प्रमुखांची छबीदेखील प्रसिद्ध केली आहे. यामुळे तसे पाहिले, तर त्यांचा प्रवेश हा ठरलेलाच आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटातच ठाकरे गटातील जवळपास 12 हून अधिक माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी सामील झाले आहेत. आता धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्षही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडे गेल्याने ठाकरे गटातील इतरही नाराज नगरसेवक आणि पदाधिकारी आता शिंदे गटाच्या मार्गावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास ठाकरे गटाला हा मोठा हादरा ठरू शकतो. कारण निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर करताना ठाकरे गटातील नाशिकमधील अनेक पदाधिकार्‍यांचे फोन स्वीचऑफ झाले होते. त्यामुळे अनेकांनी स्वत:ला या प्रकरणापासून दूर ठेवणेच पसंत केले.

भाजप, ठाकरे गटासमोर आव्हान : मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी एकाच वेळी 12 माजी नगरसेवकांना सोबत घेत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा हादरा दिला. शिंदे गटाबरोबरच सत्तेत असणार्‍या भाजपला मात्र अशा प्रकारचे इनकमिंग करून घेता आलेले नाही. ठाकरे गटातही मोठी चर्चा होईल, असा कुणाचा प्रवेश झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटाची अर्थात शिवसेनेची वाढत असलेली ताकद पाहता महापालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गटापुढे शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे मोठे आव्हान असेल हे मात्र नक्की!

हेही वाचा :

The post नाशिक : शिंदे गटाची ताकद वाढणार appeared first on पुढारी.