नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन

शिंदे गट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील बीकेसी मैदानावर येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्यात राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा दसरा मेळावा होणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अधिकाधिक शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) सचिव संजय माशिलकर यांनी केले आहे.

दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत माशिलकर यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, पक्षाचे जयंत साठे, राज सुर्वे, नवनिर्वाचित जिल्हा सहसंपर्कप्रमुख काशीनाथ मेंगाळ, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, सदानंद नवले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मीबाई ताठे, शिवाजी भोर, तानाजी गायकर, मामा ठाकरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध गावांमधील अनेक सरपंचांनी शिवसेने (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. यावेळी माशिलकर आणि खा. गोडसे यांनी प्रवेशार्थींचा सत्कार करत पक्षाच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपण बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नसलो तरी आपण सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांचे योगदान आणि उपस्थिती महत्त्वाची आहे. मेळावा यशस्वीतेसाठी प्रत्येक तालुक्यातून हजारो शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव माशिलकर यांनी केले. बैठकीनंतर माशिलकर यांनी पक्षबांधणीसाठी उपस्थित सर्व शिवसैनिकांची ‘वन टू वन’ भेट घेत त्यांच्याकडून आजपर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला.

हेही वाचा:

The post नाशिक: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास सहभागी होण्याचे सचिव माशलकरांचे आवाहन appeared first on पुढारी.