नाशिक : शिक्षक आमदारांची उद्यापासून पुणे ते मुंबई पायी दिंडी, ‘या’ आहेत मागण्या

किशोर दराडे

येवला  : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
राज्यातील 21 हजार शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्यावे, जुनी पेन्शन लागू करावी यासह राज्यातील शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी शिक्षक आमदार रविवारपासून पुणे ते मुंबई पायी दिंडी काढून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहे. यांसदर्भातनाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी माहिती दिली आहे.

रविवारी (दि. ११) रोजी पुणे येथे सुरु करण्यात आलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेपासून भिडे वाडा, दगडूशेठ हलवाई मंदिर समोरहून पायी दिंडीची सुरुवात होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे चार आमदार करणार आहेत.

शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत असून सरकार बदलले तरी प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी दिंडी पुण्यावरून मुंबईला जाणार आहे. शासन स्तरावर ३ हजार ९६९ शाळा, वर्ग व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या आहे. या तुकड्यांवरील २१ हजार ४२८ कार्यरत शिक्षकांना निधीसहित घोषित करून शंभर टक्के अनुदान द्यावे, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळेचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा, विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय लागू करून अनुदान द्यावे, विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय निर्गमित करणे, ज्युनियर कॉलेजच्या वाढीव पदांना मान्यता देऊन अनुदान लागू करावे, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. या मागण्यांसाठी आंदोलन हाती घेतल्याचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.

शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढील काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक जन आंदोलन करण्यात येईल. शिक्षकाला आज वेतनाअभावी रोजंदारी व शेतात मजुरी करण्याची वेळ येत आहे. काही शिक्षकांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. फुले, शाहु, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिक्षकांवर अशी वेळ येणे ही लाजिरवाणी बाब असून शिक्षकांना न्याय मिळण्याची गरज असल्याचे दराडे यांनी म्हटले आहे

हेही वाचा :

The post नाशिक : शिक्षक आमदारांची उद्यापासून पुणे ते मुंबई पायी दिंडी, 'या' आहेत मागण्या appeared first on पुढारी.