नाशिक : शिक्षक भरतीच्या नियमावलीत तफावत; ‘युवाशाही’ ची तक्रार

शिक्षक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या सर्वत्र शिक्षक भरतीचे वारे वाहत असून, इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, विविध विभागांमार्फत राबविण्यात येणार्‍या शिक्षक भरतीच्या नियमावलीत मोठी तफावत दिसून येते. याबाबत युवाशाही संघटनेने थेट राष्ट्रीय शिक्षक-शिक्षण परिषदेकडे तक्रार केली असून, सर्व शिक्षक भरतीसाठी समान नियमावली करावी, असे साकडे संघटनेने निवेदनाद्वारे घातले आहे.

राष्ट्रीय शिक्षक-शिक्षण परिषदेने 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता पहिली ते आठवी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे, तर महाराष्ट्रात 2017 पासून शिक्षकांची रिक्तपदे ही पवित्र पोर्टल अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पवित्र पोर्टल अंतर्गत गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, समाजकल्याण, अल्पसंख्याक, आदिवासी विकास विभाग, तसेच इंग्रजी, उर्दू, मराठी, बंगाली सर्व माध्यमांच्या शिक्षकांना व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेची एकच नियमावली लागू करण्याची गरज आहे. तरच गुणवत्तेला अर्थातच उमेदवारांना समान संधी निर्माण होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. तुषार शेटे, अश्विनी कडू,
तुषार देशमुख, चतुरसिंग सोळुंके, रामधन ठोंबरे, विजय पाटील यांनी निवेदन दिले.

जर शिक्षण घेणारा हा कोणत्याही माध्यमात किंवा विभागात शिक्षण घेत असेल, तरी तो विद्यार्थी असतो. तर शिक्षकांना वेगवेगळे नियम का? राष्ट्रीय शिक्षक-शिक्षण परिषदेची एकच नियमावली प्राथमिक शिक्षकांसाठी बंधनकारक करून भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाही. – अश्विनी कडू, उपाध्यक्ष, युवाशाही संघटना

हेही वाचा:

The post नाशिक : शिक्षक भरतीच्या नियमावलीत तफावत; 'युवाशाही' ची तक्रार appeared first on पुढारी.