नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये नाशिकच्या निवडणुकीची चर्चा राज्यभर झाली होती. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराने अपक्ष अर्ज भरला होता. त्यानंतर त्यांना विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली असल्याचे समोर आले होते. त्यांनी माघारीच्या पहिल्याच दिवशी माघारी घेतली आहे. त्यांच्यासह आणखी तीन उमेदवारांनी माघारी घेतली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांचादेखील समावेश आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी अखेरच्या क्षणी आपापले उमेदवार निवडणुकीमध्ये उतरवल्यानंतर राजकारण तापले आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या ७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची मुदत ७ जून होती. तर सोमवारी (दि.१०) अर्ज छाननी झाली. अर्ज छाननीनंतर ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यामध्ये महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातर्फे विद्यमान आमदार किशोर दराडे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे ॲड. महेंद्र भावसार यांचे अर्ज, तर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे डी. बी. पाटील सर यांचा अर्ज, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ॲड. संदीप गुळवे यांचा अर्ज वैध ठरला आहे. याव्यतिरिक्त किशोर प्रभाकर दराडे यांचा राष्ट्रीय जनक्रांती पक्षातर्फे, तर भागवत गायकवाड यांचा समता पार्टीच्या वतीने केलेला अर्ज वैध ठरला आहे. उर्वरित ३० अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.
अपक्षांमध्येदेखील राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू तथा प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती असलेले डॉ. राजेंद्र विखे-पाटील, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव तथा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे, शिक्षक लोकशाही आघाडी पुरस्कृत उमेदवार प्रा. भाऊसाहेब कचरे हे प्रबळ उमेदवारांचा समावेश आहे.
माघारीसाठी ३ पर्यंत मुदत
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ पर्यंत मुदत आहे. या ठिकाणी उमेदवाराला स्वत:ला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकृत केलेल्या प्रस्तावकाला समक्ष येऊन माघारीसाठी अर्ज करावा लागणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अपक्ष उमेदवार थेट सापुताऱ्याहून
आज माघारी झालेले अपक्ष उमेदवार संदीप नामदेव गुळवे हे थेट सापुताऱ्याहून विभागीय आयुक्त कायार्लयात उपस्थित झाले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना शिंदे गटाच्या काही कार्यकत्र्यांनी पळवले होते, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
आज माघारी झालेले उमेदवार
- किशोर प्रभाकर दराडे – अपक्ष
- संदीप नामदेवराव गुळवे – अपक्ष
- शेख मुखतार अहमद – अपक्ष
- रूपेश लक्ष्मण दराडे – अपक्ष
हेही वाचा: