Site icon

नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पहिल्या श्रावणी सोमवार (दि.1) साठी शिवभक्त सज्ज झाले आहेत. पंचवटीमधील श्री कपालेश्वरासह शहर-परिसरातील छोट्या-मोठ्या शिवमंदिरांमध्ये यानिमित्ताने रंगरंगोटीसह आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोना निर्बंधमुक्त श्रावण महिना साजरा होणार असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरे सजविण्यात आली आहेत. फुलांच्या माळा आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरे उजळून निघाली आहेत. पंचवटीमधील पुरातन श्री कपालेश्वर मंदिरातही सोेमवारसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. पहाटेपासूनच दिवसभर शिवपिंडीवर महाभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक ः तिळभांडेश्वर मंदिराला करण्यात आलेली रंगरंगोटी.
तिळभांडेश्वर मंदिर फुलांनी सजविलेले शिवलिंग. (सर्व छायाचित्रे-रुद्र फोटो)

गोदाघाटावरील नारोशंकर, तिळभांडेश्वर, अद्वैतेश्वर, रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर, तपोवनातील शर्वायेश्वर, आडगाव नाक्यावरील मनकामेश्वर, गंगापूर रोडवरील सोमेश्वर यांसह शहरातील शिवमंदिरांतदेखील श्रावणी सोमवारनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी असणार आहे. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भगवान शंकरांना प्रिय असणारे बेल व पांढर्‍या फुलांना अधिक मागणी असल्याने फूलबाजार बहरला आहे. दरम्यान, पहिल्याच सोमवारी शिवमंदिरांमध्ये भाविक गर्दी करण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस विभागाने बंदोबस्ताचा आढावा घेतला.

त्र्यंबकेश्वरला जय्यत तयारी

त्र्यंबकेश्वर मंदिर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर येथेही श्रावणी सोमवारसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर-परिसर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. तसेच यंदाच्या वर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन समितीसह त्र्यंबक नगर परिषद आणि तहसील कार्यालयाकडून शहरात विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. पोलिसांकडूनही बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा appeared first on पुढारी.

Exit mobile version