नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास

Subhod Gangurde www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
रायगड ते एव्हरेस्टपर्यंतचा सायकल प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचवण्याचे सुबोध गांगुर्डे या तरुणाचे ध्येय आहे. तो 365 दिवसांत 370 किल्ले सर करणार आहे. सुबोधने नुकताच विश्रामगड सर केला. ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने सुबोध गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

सुबोध हा रोहा तालुक्यातील रहीवासी असून, त्याने रायगड सर करून संकल्पपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. जनसेवा संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांनी सत्कारानंतर जमेल तेवढी मदत करू, असे आश्वासन दिले. सुबोधला अर्थसहाय्य करण्यासाठी 9307467564 या संपर्क क्रमांकावर गुगल पे, फोन पे नंबरवर स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन भोर यांनी केले. स्वराज्य संघटनेचे निमंत्रक योगेश शिंदे यांनी सुबोधच्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा एव्हरेस्ट शिखरावर फडकणार असल्याने ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. यावेळी रवींद्र भोर, योगेश शिंदे, सागर भोर, राहील मनियार, समाधान काकड, नमीर मोमीन, सागर भागवत, बापू गाडेकर, राहुल तुपे, ऋतिक दराडे आदी उपस्थित होते.

31 दिवसांत 46 किल्ले…
गेल्या 31 दिवसांमध्ये सुबोधने 46 किल्ले सर केले. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला सर करून त्याने छत्रपतींचे आशीर्वाद घेतले व एव्हरेस्टपर्यंतच्या सायकलवारीला सुरुवात केली. रेवदंडा, अलिबाग, मुरुड, कर्नाळा, बेलापूर, वसई, पालघर, घोडबंदरमार्गे अलंग-मदन-कुलंग असा विश्रामगडापर्यंतचा प्रवास केला आहे. यापुढे नाशिक जिल्ह्यातील आडकिल्ला, डुबेरगड, हरिहर, रामशेज या किल्ल्यांकडे जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी केला रायगड ते एव्हरेस्टपर्यंत सायकल प्रवास appeared first on पुढारी.