नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ

शिवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करून भाजपाशी युती करीत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्षासह पक्षनेतृत्वावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत हा वाद अडकल्यानंतर शिवसेना पक्ष व पक्षप्रमुखांवर शिवबंधनानंतर पुन्हा एकदा निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिकांना 100 रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे 100 रुपयांच्या मुद्रांकांची मागणी वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातील 39 आमदारांनी बंड पुकारून भाजपासोबत युती केली. दरम्यान, शिवसेना पक्षाची मूळ विचारसरणी हिंदुत्वाची आहे. त्या विचारांची कास पकडून भाजपासोबत युती केल्याचे सांगत आम्ही शिवसेनेतच आहोत असा दावा शिंदे गटाने केला. त्यानंतर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा करण्याची तयारी शिंदे गटाने केल्याने मूळ शिवसेना पक्ष व पक्षचिन्ह आपलेच आहे हे सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे. ही कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी आता शिवसेनेने निष्ठा दाखवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर जोर दिला आहे. त्यानुसार शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र करून मागवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको, तर प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे द्या’ असे आवाहन केले होते. शिवसेना पक्ष व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दाखवण्यासाठी स्थानिक पदाधिकार्‍यांनी सुमारे 1,100 प्रतिज्ञापत्रे मुंबईला पाठवले आहेत. तर एकूण 11 हजार प्रतिज्ञापत्रे पाठवणार आहेत. त्यामुळे 100 रुपयांच्या मुद्रांकाला अचानक मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत मुद्रांकांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र मागणी वाढली तरी त्याचा तुटवडा भासणार नसल्याचे लेखा कोषागार विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षावरील निष्ठेपायी इतर सर्वसामान्य नागरिकांना मुद्रांकाचा तुटवडा भासणार नाही, असे तरी सध्या दिसते.

असे आहे प्रतिज्ञापत्र
‘माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम—ाट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. मी असेही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून,त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. आणि या निष्ठेची पुनश्च: पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहील, याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे’.

शहरातील मुद्रांक विक्री

महिना   मुद्रांक   नग
एप्रिल      70,040
मे            64,944
जून         94,886
जुलै        77,760 (27 जुलै)

हेही वाचा :

The post नाशिक : शिवसैनिकांच्या निष्ठेपायी मुद्रांकांच्या मागणीत वाढ appeared first on पुढारी.