नाशिक : शिवसैनिक बाळा कोकणे हल्लाप्रकरणी चौघे गजाआड

गजाआड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश ऊर्फ बाळा सदाशिव कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. चौघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, दोघांवर खुनाचे तर चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनोज श्यामराव पाटील (31, रा. मोरे मळा, पंचवटी), पंकज सुधाकर सोनवणे (31, रा. अंबड), सागर सुदाम दिघोळे (30, रा. अंबड) व सूरज ओमप्रकाश राजपूत (रा. अंबड लिंक रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गुरुवारी (दि.28) गडकरी चौकातून चौघा संशयितांना पकडल्याची माहिती पोलिस उपआयुक्त संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यातील इतर संशयित फरार असून, त्यांचाही शोध सुरू आहे. नीलेश कोकणे हे 19 जुलैला रात्री 10.30च्या सुमारास शिवसेना कार्यालयातून घरी जात असताना एका टोळक्याने त्यांच्यावर रेडक्रॉस सिग्नलजवळ प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात
हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक कारणावरून झाला, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. गुन्हेगारांची ओळख पटूनही त्यांना अटक होत नसल्याने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेतली होती. बंडखोर गटाकडून शिवसैनिकावर हल्ला झाल्याचा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला होता. त्याचप्रमाणे गुरुवारी (दि.28) पोलिसांना निवेदन देत आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला व गुरुवारीच पोलिसांनी संशयितांना अटक केल्याने हा योगायोग की सेनेच्या दबावामुळे संशयित पकडले गेले, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

चौघेही सराईत ः सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौघा संशयितांनी सप्टेंबर 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान एका इस्टेट एजंटचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती व दोन लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी चौघांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सूरज राजपूत विरोधात शहापूर येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सागर दिघोळे विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, या प्रकरणी त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे समजते.

मुख्य संशयित फरारच ः पोलिसांनी या गुन्ह्यात चौघांना अटक केली असली तरी मुख्य संशयित फरार असल्याचे समजते. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून झाला व कारण कोणते होते हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट न केल्याने अनेक चर्चांना फाटे फुटले आहेत. हा हल्ला नाशिकरोड येथील शिंदे गटाच्या समर्थनार्थ लागलेल्या फलकावर शाई फेक करण्यावरून झाल्याचा संशय वर्तवला जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिवसैनिक बाळा कोकणे हल्लाप्रकरणी चौघे गजाआड appeared first on पुढारी.