नाशिक : शेतकर्‍याची पोर झळकणार रुपेरी पडद्यावर

कळवण www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
जुनी बेज गावातल्या शेतकरी कुटुंबातील नेहा शशिकांत सोनवणे हिने गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. येत्या 3 मार्चला प्रदर्शित होणार्‍या ‘रौंदळ’ची कसमा परिसरातल्या प्रेक्षकांना ओढ लागली आहे. शेतकर्‍याच्या जीवनावर आधारित ‘रौंदळ’चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ आणि संगीतप्रधान ‘बबन’ या रोमँटिक चित्रपटांत मुख्य भूमिकेत असलेला भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनवणे या चित्रपटाचे नायक-नायिका आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि मराठी शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन नाशिकला बी ई. कॉम्प्युटरचे शिक्षण घेत असलेल्या नेहाला चित्रपटसृष्टीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. केवळ जिद्द, चिकाटी आणि शेतीकामातील ज्ञानामुळे तिला या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर, बारामती, नारायणगाव, पुण्यात झाले आहे. शूटिंगदरम्यान शेतीकामे, ऊसतोड, मोळी उचलण्याचा आदी अनुभव घेतल्याचे नेहाने सांगितले. शेतकर्‍यांसाठी असलेल्या चित्रपटात अभिनय करताना समाधान वाटल्याचे नेहाने सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकर्‍याची पोर झळकणार रुपेरी पडद्यावर appeared first on पुढारी.