Site icon

नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन

ओझर (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा 

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करतांना आपल्यातला पोलीस जागृत करावा. सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन गावपातळीवर असलेल्या ग्रामसभेत सौदा पावतीचा ठराव करूनच व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी केले. येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आयोजित शेतकरी पोलीस संवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, द्राक्ष बागायतदार संघांचे पुणे उपाध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख आदि उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्या व्यवहाराची वास्तविकता विषद करत जे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात त्यांचे नाव काळ्या यादीत टाकवीत असे सांगत स्थानिक ग्रामपालिकेत व पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्यांची माहीत देण्याचे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे सांगत दोन पैसे वाढवुन देणाराच व्यापारी धोका देतो. फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी फाॅरमेट तयार करणार असल्याची ग्वाही दिली.

पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करतांना त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड तपासावेत. दिलेला धनादेश स्थानिक बॅॆकेत जाऊन तत्काळ तापासून घ्यावा. व्यवहार करतांना शाॅर्टकट शोधू नका. लालचेला बळी पडु नका असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केले. या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी आपबिती अधिकाऱ्यांसमोर कथन केली तर काही शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

या संवाद मेळाव्यास द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक अॅड रामनाथ शिंदे, भाऊसाहेब गवळी, संकेत गायकवाड, अशोक माळोदे विलास बोरस्ते, सुरेश खोडे आदि उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Exit mobile version