नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर

नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पीक काढणीचा खर्चदेखील परवडत नसल्याने त्यांनी बुधवारी (दि.१) आपल्या पाच एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरने नांगर फिरवला.

अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा अडीच लाख रुपये इतका खर्च झाला. मात्र, कोबी पिकाला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने त्यांनी शासनाचा निषेध नोंदवीत पाच एकर कोबी पिकावर नांगर फिरवला. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा अंबादास खैरे यांनी दिला आहे. खैरे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत.

मी एक सुज्ञ युवा शेतकरी आहे. कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यास भाग पाडले जाईल. सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा शासनाला पळता भुई थोडी करू.

– अंबादास खैरे, शेतकरी

हेही वाचा : 

The post नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर appeared first on पुढारी.