नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला

मारहाण www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने सख्खा माजी सैनिक असलेला भाऊ व भावजय आणि पुतणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना ताब्यात घेतले आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेवरून “सख्खा भाऊ पक्का वैरी ” अशी म्हणायची वेळ आली आहे. गंभीर जखमी मांगु लोखंडे हे देवळा तालुक्यातील आजी-माजी सैनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह पत्नी तसेच मुलीवर त्यांच्या सख्ख्या भाऊ व त्याची मुलं व पत्नी यांनी सर्वांनी मिळून कुऱ्हाड, कोयता व लोखंडी सळई अशा तीक्ष्ण धारदार हत्यारांनी जीवघेणा प्राणघातक हल्ला केला. यावरुन शेतीच्या रस्त्याच्या वादातून मारेकरी सख्खा भाऊ संजय रतन लोखंडे त्याची पत्नी मनीषा, मुलगा सागर व प्रेम यांना ताब्यात घेतले आहे. तर फिर्याद दाखल केल्यानुसार मांगु रतन लोखंडे व त्याची पत्नी कल्पना तसेच मुलगी माधुरी यांना शनिवारी (दि. २१) रोजी बेदम मारहाण करण्यात आल्याने या मारहाणीत मांगु लोखंडे व त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथे देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेत मारहाण करण्याऱ्या आरोपींना ताब्यात घेत  गुन्हा दाखल केला आहे. तर अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत. आजी माजी सैनिक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी सैनिक संघटनेचे जनसंपर्क अध्यक्ष प्रविण बोरसे यांनी पोलीसांकडे केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतातून जाणा-या रस्त्याच्या वादातून सख्या भावाचा भावावर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.