नाशिक : शेतीच्या वादातून भावाचा खून, पाटात सापडला होता मृतदेह

nashik murder

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद शिवारात अपघाताचा बनाव रचून सख्या भावाचाच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेतीच्या वादातून भावानेच खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दीपक कराड व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलिस करीत आहेत.

ज्ञानेश्वर साहेबराव कराड (४०) हे कुटुंबासमवेत मखमलाबाद शिवारात गंगापूर कॅनाॅल जवळील नर्सरीसमोर राहत होते. गुरुवारी (दि. १२) आई लंकाबाई साहेबराव कराड यांनी लहान मुलगा दीपक यास फोन करून रात्री ज्ञानेश्वर घरी आला नसल्याबाबत कळविले. दीपकने मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने शोध घेतला असता ज्ञानेश्वर कराड हे दुचाकीसह गायकवाड मळ्यासमोर पाटात पडलेले आढळून आले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून रक्तस्त्राव होऊन मयत झाल्याचे यावेळी दिसून आले. यानंतर ही माहिती म्हसरूळ पोलिसांना देण्यात आली. त्यावरून या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु हा खरोखर अपघात की, घात याबाबत पोलिसानी संशय व्यक्त करून त्या अनुषंगाने तपास केला असता हा खून असल्याचे समोर आले. मयत ज्ञानेश्वर यांचा भाऊ दीपक कराड यानेच इतर साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आले. दीपक कराडसह दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी वंदना ज्ञानेश्वर कराड यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

…म्हणून काढला काटा

मखमलाबाद शिवारात पाटालगत साहेबराव कराड यांनी १०२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावाने खरेदी केली. यातील दहा गुंठे जमीन विकून मुलगा दीपकला फ्लॅट खरेदी करून दिला होता. उर्वरित जमिनीपैकी ४० गुंठे जमीन दुसऱ्या पत्नीच्या नावावर, ५२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावावर ठेवली होती. दीपकने सावत्र आईच्या अडाणीपणाचा फायदा घेत ५२ गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. परंतु ही जमीन कष्टार्जित असल्याने फसवणुकीबाबत सावत्र आईने न्यायालयात दावा दाखल करून जमीन परत मिळविली. या संपूर्ण प्रकरणात ज्ञानेश्वरने आपल्या आईला मदत केली होती. याचाच राग मनात धरून दीपकने ज्ञानेश्वरचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शेतीच्या वादातून भावाचा खून, पाटात सापडला होता मृतदेह appeared first on पुढारी.