
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वाजगावमध्ये वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत संदीप रमेश देवरे यांच्या शेतातील 30 क्विंटल मक्याची कणसे, तसेच तीन ट्रॉली चारा जळून खाक झाला. या शेतकर्याचे अंदाजे 42 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाजगाव-वडाळे रस्त्यालगत संदीप देवरे यांची शेती आहे. 32 गुंठे क्षेत्रात (गट नं. 564) लावलेल्या मका कापणीचा मक्ता स्थानिक मजुरांना दहा हजार रुपयांना दिला होता. मजुरांनी सोमवारी शेतातील मका कापणी केली. खुडलेली मक्याची कणसे शेतातच पडलेली होती. ह्या शेतावरून वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता भारनियमन वेळापत्रकानुसार वीज आली. लोंबकळणार्या तारांवर बसलेले पक्षी एकाच वेळी उडाल्याने तारा हेलकावून शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या उडून शेतात पसरलेल्या मक्याच्या चार्याने पेट घेतला. आग लागल्यानंतर परिसरातील शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु शेतात पसरलेल्या सर्वच चार्याने पेट घेतल्यामुळे आग विझविणे अशक्य झाले. सर्व चारा व मक्याची कणसे जळून खाक झाली. सहायक अभियंता जितेंद्र देवरे यांच्या पथकाने शेताची पाहणी केली. घटनेबाबत इलेक्ट्रिकल अभियंता यांना कळविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तलाठी कुलदीप नरवडे यांनी पीक नुकसानीचा पंचनामा केला. संदीप देवरे यांनी वीज कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. लोंबकळणार्या तारांमुळे दरवर्षी शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडून शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. कंपनीने या सदोष तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
हेही वाचा:
- नाशिक : मालेगाव उपविभागात 1,040 वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट
- सातारा : मुख्यमंत्र्यांच्या गावात… पोलिस बंदोबस्ताचा घामटा
- नाशिक सिटिझन्स फोरमची महामार्गाबाबत याचिका
The post नाशिक : शॉर्टसर्किटने 30 क्विंटल मक्यासह 3 ट्रॉली चारा खाक appeared first on पुढारी.