नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

श्रावण सोमवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

श्रावणी सोमवारसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून २० अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर श्रावणी सोमवारी नाशिक-त्र्यंबक दरम्यान १२५ अतिरिक्त फेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी ही माहिती दिली. सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर बससेवा पुरविली जाते. या मार्गावर दररोज २५ बसेस प्रवाशांना सुविधा प्रदान करतात. दर श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीला प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात सिटीलिंकच्या बसेस पुरेशा नसल्याने सिटीलिंक प्रशासनाने श्रावणी सोमवारच्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर २० अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

यात नाशिकरोडहून द्वारका मार्गे त्र्यंबकेश्वर अशा 10 बसेस, तर निमाणी- त्र्यंबकेश्वर मार्गावर १० अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. अशा प्रकारे २५ नियमित व २० अतिरिक्त अशा ४५ बसेसच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर दरम्यान २२५ फेऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी केल्या जाणार आहेत. या सर्व गाड्या थेट त्र्यंबकेश्वर येथील सिटीलिंकसाठी उपलब्ध करून दिलेल्या बसस्थानकापर्यंत जाणार असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. भाविकांनी सिटीलिंकच्या या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस appeared first on पुढारी.