नाशिक : श्री महादेव मंदिरात आज श्री हरिहर भेट उत्सव

महादेव मंदिर www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील भुईकोट किल्ला परिसरात मोसम नदी तीरावर असलेल्या पुरातन श्री महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी (दि. 6) वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री हरिहर भेट उत्सव साजरा होत आहे. या दिवशी श्री हरी विष्णू व श्री महादेव यांची भेट होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या निमित्ताने महादेव मंदिरात आनंदोत्सव साजरा होतो. यंदाच्या हरिहर भेट सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 50 वर्षांपूर्वी खंड पडलेली बालाजीचा रथ परंपरा पुन्हा सुरू होणार असून, याविषयी भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांनी 1730 मध्ये श्री महादेव मंदिराचे बांधकाम केले होते. तेव्हापासूनच मंदिरात हरिहर भेट उत्सवाची परंपरा कायम आहे. रविवारी होणार्‍या हरिहर भेट उत्सवासाठी मंदिर परिसरात भगव्या पताका, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या दिवशी श्री शिवपिंडीवर पारंपरिक मुखवटा चढविण्यात येईल. गाभार्‍यात फुलांची आरास केली जाते. तसेच मंदिर परिसरात शेकडो दिवे प्रज्वलित केले जातात. त्यामुळे भव्य दीपोत्सव साजरा होतो. हरिहर भेट उत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 6.30 वाजता भक्तांद्वारे 56 भोग नैवेद्य अर्पण केला जाईल. रात्री 9.30 पर्यंत रथातून श्री बालाजी महाराजांचे माता लक्ष्मी पद्मावतीसह मंदिरात आगमन होईल. या प्रसंगी राजस्थान सेवा समितीच्या वतीने रात्री 10 ते 12 वाजता भजन संध्या होईल. रात्री 12 वाजता श्री हरिहर भेट होऊन महाआरती होऊन फटाक्यांची आतषबाजी होईल. संपूर्ण दिवसभर मंदिर भाविकांसाठी खुले असेल.

रथ परंपरा पुन्हा होणार सुरू..
हरिहर भेट उत्सवाच्या दिवशी शहरातील रथ गल्लीतील श्री बालाजी मंदिरातून भगवान श्री व्यंकटेश माता लक्ष्मी व पद्मावतीसह रथातून विराजित होऊन महादेव घाटावरील महादेव मंदिरात येत असत व येथे श्री हरी व महादेव यांची हरिहर भेट होत असे. काही कारणास्तव गेल्या 40 वषार्र्ंपूर्वी ही रथाची परंपरा खंडित झाली होती. केवळ मंदिर परिसरात हरिहर भेट उत्सव साजरा होत असे. यासह दर सोमवारी श्री महादेवाची पालखी गावातून निघत असे. या पालखीतील श्री महादेवाचे दर्शन घेऊन शिवभक्त उपवास सोडत असत. या दोन्ही प्रथा यंदाच्या हरिहर भेट उत्सवापासून सुरू करण्यात येत असून, यासाठी महादेव सेवा समितीने जय्यत तयारी केली आहे. पुन्हा एकदा रथ परंपरा सुरू होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : श्री महादेव मंदिरात आज श्री हरिहर भेट उत्सव appeared first on पुढारी.