नाशिक : सटाणातील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात; गुन्हा दाखल

गर्भपात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : सटणा येथील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि.२) याप्रकरणी सटाणा पोलिसात पोस्कोअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सुरु होती.

तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस गुरुवारी(दि.१) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर रात्री तिच्या चार महिन्याच्या गर्भाचा गर्भपात केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी(दि.२) सकाळी उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच संबंधित मुलीचा जाब जबाब नोंदविण्यात आला. तसेच एका चोवीस वर्षीय विवाहित युवकासही ताब्यात घेण्यात आले आहे. दिवसभर याप्रकरणी सटाणा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात आला. संबंधित मुलीसह नातेवाईक तसेच संशयित युवक आणि रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी संबंधित चोवीस वर्षीय युवकाविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.

या प्रकरणामुळे सटाणा ग्रामीण रुग्णालयही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. किशोरवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न नेमका कुठे आणि कसा झाला, यापूर्वी देखील असे बेकायदेशीर कृत्य झाले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक शनिवारी सटाण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 

The post नाशिक : सटाणातील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात; गुन्हा दाखल appeared first on पुढारी.