Site icon

नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर 13 फेब्रुवारी रोजी मंदिरातील कालभैरव परिसरातील दानपेटी उचकावून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत दोन दिवसांपूर्वीच वाच्यता झाल्याने अखेर शनिवारी (दि. 4) कळवण पोलिस ठाण्यात सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीच्या मंदिरातील दानपेटी उचकावून पैसे चोरीचा प्रयत्न १३ फेब्रुवारी रोजी झाला होता. रात्रपाळीला असलेल्या संशयिताने येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर सफेद चुना लावून दानपेटीमधील पैसे काढले होते. ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी ड्यूटीवर असलेल्या इतर सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संस्थानचे प्रमुख सुरक्षारक्षक यशवंत देशमुख यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी झालेला प्रकार संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोडे यांना कळवत लेखी आहवाल दिला. मात्र, याबाबत इतके दिवस गुप्तता पाळण्यात आली होती. अखेर 17 दिवसांनंतरही या प्रकरणी वृत्रपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी संस्थानाकडून कळवण पोलिसांत फिर्याद देण्यात आल्याने संशयित सुरक्षारक्षक सोमनाथ हिरामण रावते (30) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत संबंधित संस्थानाच्या सीसीटीव्ही यंत्रणेला इजा पोहोचवणे तसेच दानपेटीतून चलनी नोटांची चोरी करणे, नोटा जाळणे याबाबात माहिती देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश निकम करत आहेत.

प्रमुख सुरक्षारक्षकास जिवे मारण्याची धमकी
या घटनेनंतर 27 तारखेलाही सुरक्षारक्षक सोमनाथ हिरामण रावते यांची व संस्थानचे सुरक्षाप्रमुख यशवंत देशमुख याच्यांत बाचाबाची झाली होती. त्यामुळे रावतेने देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यात कळवण पोलिस ठाण्यात दाखल आहे.

संस्थानकडून दडवादडवी
ही घटना घडल्यानंतर इतक्या दिवसांनंतरही कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने यात आपल्या माणसांना वाचविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे भाविकांच्या भावनेशी खेळ खेळला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सप्तशृंगीदेवी मंदिरात रक्षकच बनले भक्षक appeared first on पुढारी.

Exit mobile version