नाशिक : सप्तशृंगी ट्रस्ट विश्वस्त अन् ग्रामस्थांत तू तू-मै मै

सप्तशृंगी गड वाद

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्वस्त ग्रामस्थांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत असल्याचा आरोप माजी पोलिसपाटील शशिकांत बेनके यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

सप्तशृंगी देवी मंदिराचा कारभार सप्तशृंगी देवी ट्रस्टमार्फत चालवला जातो. पूर्वी हा कारभार पाहणारे विश्वस्त ग्रामस्थांना विश्वासात घेत. मात्र, सध्याचे विश्वस्त मंडळ न्यायव्यवस्थेचा धाक दाखवून ग्रामस्थांना सन्मान देत नाहीत. सर्वसामान्य भाविकांसाठी आणि ग्रामस्थांसाठी काही करण्यापेक्षा व्हीआयपींना महत्त्व देतात. याबाबत विश्वस्ताकडे मंदिर कामकाजाबाबत माहिती विचारली असता संबंधित विश्वस्ताने मला वेळ नाही. याबाबतची माहिती माझ्याकडे नाही, असे सांगितल्याचा आरोप बेनके यांनी केला आहे. दरम्यान, प्रकरणानंतर अनेक ग्रामस्थांनी ट्रस्टच्या कार्यालयातच इतर विश्वस्तांना जाब विचारला. जर तुम्हाला ग्रामस्थांचे आणि भाविकांचे प्रश्न ऐकायला आणि उत्तर द्यायला वेळ नसेल तर तुम्ही विश्वस्त झालातच कशाला? तसेच कोणता विभाग कोणत्या विश्वस्तांकडे आहे याची माहिती प्रसिद्ध करा. यावेळी विश्वस्त व ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. मात्र, कर्मचारी व भाविकांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले व ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याची दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला.

अध्यक्षांनी ग्रामस्थ, पत्रकार यांच्याशी बोलण्यासाठी आणि बांधकामाबाबत माहिती देण्याची जबाबदारी सहकारी विश्वस्त ललित निकम यांच्याकडे दिली आहे. तसेच पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना नाशिक येथे घेऊन जाणे आवश्यक असल्याने आपण ग्रामस्थांना वेळ देऊ शकलो नाहीत. ग्रामस्थांनी गैरसमज करू नये.
– भूषणराज तळेकर, विश्वस्त, सप्तशृंग ट्रस्ट

हेही वाचा :

The post नाशिक : सप्तशृंगी ट्रस्ट विश्वस्त अन् ग्रामस्थांत तू तू-मै मै appeared first on पुढारी.