Site icon

नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

दिवाळी उत्सवादरम्यान भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन गडावरील श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर दि. २७ ऑक्टोबरपासून येत्या दि. १३ नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहे.

दिवाळीनंतर राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा- महाविद्यालये यांना सुटी असते. तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, नवरात्रोत्सवात व मागील दोन वर्षांत कोरोना साथीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येऊ न शकलेल्या भाविकांची संख्या विचारात घेता गर्दी वाढू शकते. गर्दीची स्थिती टाळण्याच्या हेतूने श्री भगवती मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवल्यास भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागला जाईल. परिणामी भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. दरम्यान, आवश्यकतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षारक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदींसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनिकुलर रोप-वे ट्रॉली सुविधादेखील भाविकांना सुरू असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले आहे.

सप्तशृंगगडावरील देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 27 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त शालेय सुट्या असल्याने मुंबई, पुणे, गुजराथ, इंदूर, मध्य प्रदेश आदी ठिकाणांहून भाविक येतात. या भाविकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त संस्थेने हा निर्णय घेतला आहे. – ॲड. दीपक पाटोदकर, विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट.

हेही वाचा:

The post नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले appeared first on पुढारी.

Exit mobile version