Site icon

नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश निर्माण सुधारणा करण्यात येऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना असलेली शिक्षणाची अट रद्द करून सफाई कर्मचार्‍यांना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे.

आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने शासनाकडून अहवाल मागविण्यात आला होता. महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व आरोग्य अधिकारी डॉ. आवेश पलोड यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार देवयानी फरांदे यांनी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास मनपाला भाग पाडले. मनपाने दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला असून, शासन निर्णयामुळे नाशिक महापालिकेंतर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या शासन निर्णयात अग्निशामक पथकात नेमणूक करताना पदास जोखीम भत्ता म्हणून देण्यात आलेले पाचशे रुपये वाढवून ही रक्कम पाच हजार करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यानिमित्त आमदार फरांदे यांच्या निवासस्थानी नाशिक महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी फरांदे यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना आमदार फरांदे यांनी आपण या पुढील काळातदेखील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत त्यांच्यासोबत असल्याचे नमूद केले. यावेळी सुनील फरांदे, दर्शन बलसाने, घनश्याम गायकवाड, विशाल घोलप, विजय थोरात, एकनाथ ताठे, विजय जाधव, संदीप गांगुर्डे, संग्राम साळवे, जितेंद्र परमार, सुशील परमार, जयश रबरिया, शैलेश शिंदे, चिंतामण पवार, अजय ढोमसे, संजय सोनवणे, सचिन झांझोटे, राहुल तसांबड, संतोष गायकवाड, अनिल गांगुर्डे, विशाल आवारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Exit mobile version